• Tue. Jul 22nd, 2025

कै. दामोधर विधाते विद्यालयात रंगला मैदानी स्पर्धेचा थरार

ByMirror

Dec 14, 2023

वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात

क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी -प्रा. संजय साठे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी स्पर्धेचा थरार रंगला होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन घडविले.


राष्ट्रीय खेळाडू प्रा. संजय साठे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन व आकाशात फुगे सोडून क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश भागानगरे, संस्थेचे विश्‍वस्त बाळासाहेब विधाते, रामदास कानडे, सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रा. संजय साठे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे. क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रकाश भागानगरे म्हणाले की, जीवनात खेळ आनंद निर्माण करतो. तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रा. शिवाजी विधाते यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात अमोल मेहत्रे यांनी खेळाचे महत्त्व विशद केले. पाहुण्यांचा परिचय योगेश दरवडे यांनी करुन दिला.


वार्षिक क्रीडा मेळाव्यात शालेय मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी कबड्डी, खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उंडी आदी सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन क्षिरसागर यांनी केले. आभार लता म्हस्के यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *