आरएसएसच्या नोंदणी व आर्थिक पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर; “नोंदणी दाखवा, हिशेब दाखवा, लेखापरीक्षण दाखवा”
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा लोकशाही पारदर्शकतेसाठी एल्गार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणी, कायदेशीर अस्तित्व, आर्थिक व्यवहार, निधीचे स्रोत, खर्चाचे तपशील आणि लेखापरीक्षण अहवाल सार्वजनिकपणे जाहीर करण्याची मागणी करणारे कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या भूमिकेचे स्वागत करत पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने त्यांना ‘न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे’ राष्ट्रीय मानवंदना अर्पण करण्याचा ठराव करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना ॲड. कारभारी गवळी आणि अशोक सब्बन यांनी सांगितले की, शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथील हुतात्मा स्मारक येथे हा मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायद्याचे राज्य यांना बळकटी देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
त्यांनी सांगितले की, देशातील कोणतीही मोठी, प्रभावशाली आणि व्यापक सामाजिक प्रभाव असलेली संस्था कायद्याच्या आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाच्या चौकटीबाहेर राहू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास लाभला असून, देशभरात त्याच्या हजारो शाखा, लाखो स्वयंसेवक आणि विविध सामाजिक उपक्रम कार्यरत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत संघटनेचे कायदेशीर स्वरूप नेमके काय आहे, तिची अधिकृत नोंदणी कुठे आणि कोणत्या स्वरूपात आहे, निधी कोठून प्राप्त होतो, वार्षिक खर्च किती होतो आणि त्या खर्चाचे लेखापरीक्षण कोणत्या यंत्रणेद्वारे केले जाते, हे प्रश्न उपस्थित करणे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲड. कारभारी गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले की, देशातील सामान्य नागरिक, लहान-मोठ्या संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, देवस्थान ट्रस्ट, मशिदी, चर्च आणि विविध सार्वजनिक मंडळांना शासनाकडे नोंदणी, करभरणा, लेखापरीक्षण आणि आर्थिक हिशेब सादर करण्याची कायदेशीर जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे देशव्यापी प्रभाव असलेल्या कोणत्याही संस्थेला पारदर्शकतेपासून सूट मिळता कामा नये.
“नोंदणी म्हणजे संस्थेची कायदेशीर ओळख, लेखापरीक्षण म्हणजे आर्थिक प्रामाणिकपणाची खात्री आणि सार्वजनिक उत्तरदायित्व म्हणजे लोकशाहीची शिस्त. राष्ट्रसेवेचा दावा करणाऱ्या कोणत्याही संस्थेने राष्ट्रासमोर आपले हिशेब मांडण्यास तयार असले पाहिजे,” असे मत ॲड. गवळी यांनी व्यक्त केले.
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने स्पष्ट केले आहे की, प्रियांक खर्गे यांनी उपस्थित केलेले प्रश्न कोणत्याही धर्माविरोधात, विचारधारेविरोधात किंवा सामान्य स्वयंसेवकांविरोधात नसून ते संविधान, कायदा आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित आहेत. धार्मिक श्रद्धा हा वैयक्तिक विषय असू शकतो; मात्र संघटित संस्था, त्यांचे निधी, शाखा, उपक्रम आणि सार्वजनिक जीवनावरील प्रभाव या बाबी सार्वजनिक तपासणी आणि उत्तरदायित्वाच्या कक्षेत येतात.
याच पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने राष्ट्रीय मानवंदना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. रामशास्त्री प्रभुणे यांनी सत्ताधाऱ्यांपुढे न झुकता न्याय, सत्य आणि नैतिकतेला सर्वोच्च स्थान दिले होते. प्रभावशाली संस्थांना प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखविणे ही त्याच न्यायपरंपरेची आधुनिक अभिव्यक्ती असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आवश्यक नोंदणी, लेखापरीक्षण अहवाल, कर अनुपालनासंबंधी कागदपत्रे आणि इतर कायदेशीर दस्तऐवज उपलब्ध असतील, तर ते सार्वजनिकपणे सादर करण्यात कोणतीही अडचण नसावी. तसेच विद्यमान कायद्यांमध्ये अशा मोठ्या आणि प्रभावशाली संस्थांसाठी पारदर्शकतेची सक्ती नसल्यास केंद्र आणि राज्य सरकारांनी स्वतंत्र पारदर्शकता कायदा करण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
“ही मागणी कोणत्याही प्रकारच्या द्वेषातून किंवा वैचारिक संघर्षातून करण्यात आलेली नाही. ही संविधाननिष्ठ लोकशाही, सार्वजनिक हिशेब, नोंदणी प्रक्रिया आणि नागरिकांच्या जाणून घेण्याच्या अधिकारासाठीची मोहीम आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने यावेळी असा मुद्दाही उपस्थित केला की, गरीब नागरिकाकडून पावती आणि पुरावे मागणारी व्यवस्था प्रभावशाली संस्थांकडूनही तितक्याच धैर्याने हिशेब मागत असेल, तरच लोकशाही अधिक सक्षम आणि विश्वासार्ह ठरते.
“नोंदणी दाखवा, हिशेब दाखवा, लेखापरीक्षण दाखवा आणि संविधानिक उत्तरदायित्व स्वीकारा,” हा संदेश या राष्ट्रीय मानवंदना कार्यक्रमातून दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

