अर्थविश्व’ पुस्तकाचे प्रकाशन; आर्थिक साक्षरतेसाठी नवे पाऊल
1680 सदस्यांचा प्रवास, 11 कोटींची उलाढाल;
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि बचतीची संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाच्या वतीने रविवार दि. 21 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता बचत गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘अर्थविश्व’ या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून बचत गट चळवळीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती बचत गटाचे अध्यक्ष विजय गाडळकर, उपाध्यक्ष पारुनाथ ढोकळे (सर) आणि सचिव मेजर शिवाजी वेताळ यांनी ही माहिती दिली.
मेळाव्याच्या निमित्ताने बचत गटाच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी आर्थिक साक्षरता अभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञांना निमंत्रित करून सदस्यांना अर्थव्यवस्था, बचत, गुंतवणूक, उद्योग-व्यवसाय आणि आर्थिक नियोजन याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘अर्थविश्व’ ही पुस्तिका आर्थिक सक्षमीकरण, सबलीकरण आणि आर्थिक आधार याबाबत बचत गटांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. बचत गटाची स्थापना जानेवारी 2013 मध्ये अवघ्या दोन सदस्यांपासून झाली होती. आज या गटाशी 1680 हून अधिक सदस्य जोडले गेले असून वार्षिक उलाढाल 11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या विस्तारामुळे गटाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर करण्यात आले असून त्याचे ‘अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गट’ असे नामकरण करण्यात आले आहे.
बचत गटाच्या नियमावलीमध्ये सदस्यत्व, संघटन रचना, कार्यपद्धती, कर्ज वितरण, परतफेड व्यवस्था, विशेष योजना, नफा वितरण प्रणाली आणि सदस्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आर्थिक बचत, गुंतवणूक, उद्योग, व्यवसाय, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि सेवा क्षेत्रांमध्ये सदस्यांचा सहभाग वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट गटाने ठेवले आहे.
‘सर्वांच्या श्रीमंतीत आपली श्रीमंती आणि आपल्या श्रीमंतीतून सर्वांची श्रीमंती’ या तत्त्वावर कार्यरत असलेला हा बचत गट आर्थिक शोषणमुक्त, स्वावलंबी आणि कल्याणकारी समाजव्यवस्था उभारण्याच्या दिशेने कार्यरत आहे. आर्थिक साक्षरता, पारदर्शकता, शिस्त, आत्मविश्वास आणि स्वयंप्रेरणा यांचा विकास करून सदस्यांचे शाश्वत आर्थिक कल्याण साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी बचत गटाचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, संघटक आणि सदस्य प्रयत्नशील असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

