जिल्ह्यात प्रथम, 100 परसेंटाइल गुणांनी मिळवले यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातील अहिल्यानगरची कन्या ईश्वरी सुरेश गागरे हिने MHT-CET 2026 परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. ईश्वरीने मुलींच्या गटात राज्यात अव्वल क्रमांक पटकावत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच मुला-मुलींच्या एकत्रित गुणवत्तायादीत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमानही तिने मिळवला आहे.
वनकुटे (ता. पारनेर) येथील ईश्वरीने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरत सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिने 100 परसेंटाइल गुण मिळववून तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
या परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जाते. ईश्वरीच्या या यशामागे तिची अभ्यासावरील निष्ठा, नियोजनबद्ध तयारी आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन असल्याचे तिने सांगितले आहे.
ईश्वरी ही बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब गागरे व पारनेर मधील डॉ. अण्णासाहेब गागरे यांची पुतणी असून तिच्या यशामुळे गागरे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि ग्रामस्थांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ईश्वरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार काशिनाथ दाते यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.

