वंचितांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा
बालगृहातील मुलांना फराळ, कपडे, अन्नधान्य व किराणा साहित्याची दिवाळी भेट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीचा खरा आनंद तोच, जेव्हा आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेतो, या भावनेने केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) च्या विद्यार्थ्यांनी उपेक्षित व अनाथ मुलांसह दिवाळी साजरी करून समाजात एक सकारात्मक संदेश दिला.
गुरुकुलच्या मैदानात आयोजित दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रमात तपोवन रोडवरील बालगृह प्रकल्पातील मुलांना सहभागी करून घेण्यात आले. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी या बालमित्रांना दिवाळी भेटवस्तू, फराळ, कपडे, अन्नधान्य व किराणा साहित्य देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
शाळेचे प्राचार्य आनंद कटारिया व प्राचार्या निकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निखिल बेद्रे, अक्षय नायडू, वैशाली देशमुख, हर्षा कार्ले, बिना आरवडे, अनुपमा तोडमल, योगिता पाठक आदी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी घरुन आणलेला फराळ आणि भेटवस्तू बालगृहातील मुलांना दिल्या. त्या भेटी स्वीकारताना बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. शाळांतील व बालगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्र खेळ, गाणी, नृत्य व विविध खेळांच्या माध्यमातून सण साजरा केला.
प्राचार्य आनंद कटारिया म्हणाले की, आजच्या पिढीने फक्त सण साजरा करणे नव्हे, तर समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आनंद पोहोचविणे हेही आपले कर्तव्य आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देण्याची भावना, सहानुभूती व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. फटाके फोडून आनंद घेण्यापेक्षा, त्या पैश्यातून वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करणारी दिवाळी साजरी व्हावी. या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्या निकिता कटारिया म्हणाल्या की, शिक्षण फक्त पुस्तकी मर्यादेत राहू नये. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनातील मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. उपेक्षित मुलांबरोबर दिवाळी साजरी केल्याने त्यांच्यात संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि सामूहिकतेची जाणीव निर्माण होते. हेच आमच्या शाळेच्या संस्कारशिक्षणाचे ध्येय असल्याचे ते म्हणाल्या. या उपक्रमामुळे दिवाळीचा उत्सव हा केवळ रोषणाई आणि मिठाईपुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक घटकाला आनंद देणारा सण ठरला. या उपक्रमासाठी समस्त हिंदू बांधव संघटनेच्या जिल्हाध्यक्षा ज्योती वाघस्कर, जिल्हा उपाध्यक्ष शितल दळवी, रुक्मिणी ठोंबरे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल बालगृह प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड यांनी आभार मानले.
