• Thu. Mar 5th, 2026

मतिमंद मुलांच्या शाळेत बौद्धिक अक्षम दिन साजरा

ByMirror

Dec 14, 2024

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेचा संयुक्त उपक्रम

मनोबल उंचाविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन

चौरंगावरील देवपूजा करण्यापेक्षा दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा -न्यायाधीश भाग्यश्री पाटील

नगर (प्रतिनिधी)- शहरातील टिळक रोड येथील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांच्या शाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक अक्षम दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनोबल उंचाविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


बौद्धिक अक्षम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एम.पी. पांडे, सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) ए.व्ही. ढोरे, मतिमंद विकास शिक्षण मंडळाचे जेष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश वैकर, शालेय व्यवस्थापन समितीचे खजिनदार उदय भनगे उपस्थित होते.
न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, चौरंगावरील देवपूजा करण्यापेक्षा दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. पालकांनी खचून न जाता, तुम्ही सक्षम असल्यानेच हे विशेष मूल देवाने तुमच्या पदरात टाकले आहे. या विशेष मुलांना दिशा देऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर या मुलांबाबत शासकीय कामांमध्ये काही अडचणी आल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून मदत करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


न्यायाधीश एम.पी. पांडे म्हणाले की, बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या क्षमता असून, ते ओळखण्याची गरज आहे. ही मुले कुठेही कमी नाहीत, एकमेकांच्या हातात हात घेऊन प्रत्यक्ष स्पर्धेत ते उतरतात. थक्क करणारे कौशल्य त्यांच्यात असून, त्याला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाधीश ए.व्ही. ढोरे यांनी पालकांना दिव्यांग व्यक्तीचे अधिकार आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 याबद्दल कायदेशीर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यशाळेचे प्रमुख भाऊसाहेब कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय निदेशक सुशीला जाधव यांनी करून दिला. बौद्धिक अक्षम दिनाचे महत्त्व शाळेचे वाचा उपचार तज्ञ विक्रम उंडे यांनी सांगितले. यावेळी पालक, विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विशेष शिक्षक पुष्पा बनकर यांनी केले. आभार संस्थेचे जेष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *