युवक-युवतींसाठी रंगल्या विविध स्पर्धा; महिला वकिलांचा सन्मान
युवकांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांचे हात उगारण्यासाठी नसून, उभारण्यासाठी आहे. सक्षम राष्ट्र उभारणीचे कार्य युवकांच्या हातून होणार आहे. युवकांनी क्रांती घडवून राष्ट्र उभारणीचे कार्य केल्याचा आजवरचा इतिहास आहे. युवकांच्या कार्याला इतिहास कधीही विसरणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जय युवा अकॅडमी महिला आर्थिक विकास महामंडळ, समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश पाटील बोलत होत्या. यावेळी नेहरु युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात, शहर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, नृत्य विशारद अनंत द्रविड, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे ॲड. मेहेरनाथ कलचुरी, शहर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के, जय युवा अकॅडमीच्या सचिव जयश्री शिंदे, रयत प्रतिष्ठानचे पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, आधारवड बहुउद्देशीय संस्थेच्या ॲड. अनिता दिघे आदींसह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे न्यायाधीश पाटील म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी राष्ट्र उभारणीचे कार्य करावे. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपले भवितव्य घडवावे. एकतर्फी प्रेम, महिलांवर अत्याचार, जातीयवाद, विविध गुन्ह्यांपासून लांब राहून यशाचे ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. तर मानवी तस्करी ही समाजाला लागलेली कीड असून, हे रोखण्याची जबाबदारी देखील युवकांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन कायदेविषयक माहिती दिली.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर करुन स्त्री जन्माच्या स्वागतासाठी जागृती करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे सविधान देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात शिवाजी खरात यांनी युवकांना दिशा देण्याचे कार्य नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवून युवा शक्तीला चालना देण्यासह सक्षम भारत निर्माणासाठी योगदान सुरु असल्याचे सांगितले. मेहेरनाथ कलचुरी यांनी राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त घेण्यात आलेले उपक्रम युवकांच्या कला-गुणांना चालना देणारे असल्याचे सांगितले.

उद्घाटनानंतर कोहिनूर मंगल कार्यालयात निबंध, नृत्य, हस्ताक्षर, मेहंदी, उखाणे, वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. या विविध स्पर्धेत युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिवसभर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी राष्ट्रीय युवा सप्ताहाचे प्रारंभ झाले. या स्पर्धेचे परीक्षण अनंत द्रविड, ॲड. अनिता दिघे, डॉ. संतोष गिऱ्हे, ॲड. सुनिल तोडकर, अनिल साळवे, आरती शिंदे, तनीज शेख, विनोद साळवे, दिनेश शिंदे, कल्याणी गाडळकर यांनी केले.

सावित्री ज्योती महोत्सवास भेट देणाऱ्यांसाठी दररोज सोडत सोडून भाग्यवान विजेत्यांना सेमी पैठणीचे बक्षीस दिले जात आहे. झालेल्या सोडतमध्ये सुकन्या साळी या भाग्यवान विजेत्या महिलेला सेमी पैठणीचे बक्षीस देण्यात आले. राष्ट्रीय युवा सप्ताहात अहमदनगर जिल्हा न्यायालयातील महिला वकिलांचा गौरव करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात कवी संमेलन रंगले होते. नवोदीत कवींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध सामाजिक विषयांवर कविता सादर करून प्रबोधनाचे केले.
कोहिनूर मंगल कार्यालयात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवातील महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी विविध वस्तूंची खरेदी केली. तर बचत गटातील महिलांशी संवाद साधून, अतिशय उत्कृष्ट उत्पादन असलेल्या वस्तूंची ब्रॅण्डींग करण्याचा सल्ला दिला. तर पहिल्या दिवशी तांदळाची व गावरान तुपाची विक्रमी विक्री झाली असून, विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे.