महाराष्ट्राची संस्कृती, सण-उत्सव, रुढी-परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे घडविले दर्शन
मी जे वागलो, तेच मुले वागणार असल्याने पालकांनी जबाबदारीने वागावे -नितीन घोरपडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जिवंत करुन येथील सण-उत्सव, रुढी-परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन घडविण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या या दिमाखदार सोहळ्यास व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला-गुणांना उपस्थित पालक-प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ट्रायथलिस्ट तथा आर्यनमॅन नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, विश्वस्त सुनंदा भालेराव, ॲड. गौरव मिरीकर, ॲड. किशोर देशपांडे, सल्लागार समिती सदस्या आशाताई फिरोदिया, पुष्पाताई फिरोदिया, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकाता छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरत असते. विद्यार्थी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी होऊन आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करतात. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शाळा, वर्ग, परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात रोप मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी झाली. मुलींनी रोप मल्लखांबावर जिम्नॅस्टिकचे कवायती सादर करुन शारीरिक लवचिकतेचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. तर रोप मल्लखांबावर 10 ते 15 फुट उंचीवर विद्यार्थ्यांच्या विविध धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी संगीत अध्यापिका रेणू पुरंदरे व सुवर्णा मलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर करुन नृत्याचे सादरीकरण केले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी केले.

भक्ती मेश्राम व अर्चित चोरकोले या विद्यार्थ्यांनी ट्रायथलिस्ट तथा आर्यनमॅन नितीन घोरपडे यांचा मुलाखतीद्वारे जीवनपट उलगडला. बालपणी औरंगाबादला झालेले शालेय शिक्षण व सध्या बीए सेकंड इयरला शिकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघर्षमय जीवनात अडचणींवर मात करताना त्यांनी कष्टातून श्रीमंती मिळवली. श्रीमंतीने व्यसनाच्या आहारी गेलो आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडले. मानसिक, आर्थिक व शारीरिक नुकसान होऊन पुन्हा परिस्थिती बिकट बनत गेली. त्यानंतर पुन्हा व्यायामाकडे वळून त्यांनी शारीरिक व आर्थिक परिस्थिती कशा पध्दती सुधारली हा प्रेरक संदेश विद्यार्थ्यांना दिला. 5 कि.मी. धावण्यापासून सुरु झालेला प्रवास नाशिक ते ठाणे 150 पर्यंत किलोमीटर धावणे, हाफ मॅरेथॉन व मॅरेथॉन आणि आर्यनमॅनचा किताब पर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला.

घोरपडे म्हणाले की, शरीराने मनुष्य सदृढ झाल्यास तो चांगले विचार करतो व त्याच्या हातून चांगले कार्य घडते. खेळाडू वृत्तीने हार न मानता सातत्याने प्रयत्न करणे व अपयश पचवण्याची शक्ती निर्माण होते. व्यसनाधीनता समाजात गंभीर गोष्ट आहे. मुले पालकांचे निरीक्षण करून शिकत असतात. पालकांना मुलांसमोर चांगला आदर्श ठेवण्याची गरज आहे. घरात आपण काय वागतो, तेच प्रतिबिंब मुलांमध्ये उमटत असतात. आपण व्यसनाच्या आहारी गेलो, तर भविष्यात मुले देखील व्यसनाकडे वळू शकतात. मी जे वागलो तेच मुले वागतील हे मनात ठेवून पालकांनी जबाबदारीने वागण्याचा त्यांनी सल्ला दिला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, कला, क्रीडा, विज्ञान व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणाची यादी वाचन जिक्रा शेख व मेहेक शेख हिने केले.
गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अष्टविनायकाचे दर्शन घडविण्यात आले. संबळ, वासुदेव, शाहिरी पोवाडे, कव्वाली या सांस्कृतिक कार्यक्रमाने महाराष्ट्राची लोकधारेत रंग भरला होता. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली पंढरीच्या वारीतून चिमुकल्यांनी वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले. कोळी नृत्यातून कोळी बांधवांचा सांस्कृतिक ठेवा दर्शविला. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या मातीतील पराक्रम मुलांनी जिवंत केला. मकर संक्रांत, ब्रिटिशांविरोधात लढा देताना भारतीयांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले गणेशोत्सव आदी सण-उत्सवाची माहिती देऊन महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना जिवंत करण्यात आल्या. विविध धर्माचे, जातीचे गुण्यागोविंदाने राहत असलेल्या महाराष्ट्रातील धार्मिक एकतेचे दर्शनही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून घडविले. विविध पैलूंनी व संस्कृतीने नटलेल्या महाराष्ट्राचे अभूतपूर्व दर्शनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दी गुगळे, वेदांत चौदर, अनघा भिंगारकर व वरद लोखंडे यांनी केले. आभार विद्यार्थी प्रतिनिधी रोहन अडसरे व मते सिध्दी हिने मानले. या सोहळ्याचे शिस्तबध्द व उत्तमरित्या नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्व प्राथमिकच्या विभाग प्रमुख कांचन कुमार, प्राथमिकच्या विभाग प्रमुख रेखा शर्मा, माध्यमिकचे विभाग प्रमुख वैशाली वाघ, उच्च माध्यमिकच्या विभाग प्रमुख अश्विनी रायजादे आदींसह सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
