• Tue. Jul 22nd, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी,बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान

ByMirror

May 18, 2025

इयत्ता दहावीचे चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत; दीक्षा गवळी-गायकवाड रात्रशाळेतून राज्यात प्रथम

कामे करुन शिक्षण घेतलेल्या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी अभिमानास्पद-प्रा. शिरीष मोडक

नगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या एचएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षेत कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तर इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील रात्रशाळेच्या गुणवत्ता यादीत 4 विद्यार्थिनींनी स्थान मिळवले. दिवसभर काम करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या या होतकरु विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीने गुणवत्ता सिध्द केली.


मासूम संस्था (मुंबई) यांच्या वतीने राज्यातील रात्रशाळांचे इयत्ता दहावी मधील प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. राज्यातील रात्रशाळांमधून प्रविष्ट विद्यार्थ्यांमधून टॉप टेन (10) विद्यार्थी निवडण्यात येतात यामध्ये चार विद्यार्थी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे आहेत. दीक्षा गवळी-गायकवाड (86.80 %) हिने रात्रशाळेतून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. मंदा भोराडे-पवार (76.80 %) यांनी राज्यात पाचवा तर इशिता भोर व जयश्री वैरागर-वाघमारे (74.40 %) या दोन्हींनी आठवा क्रमांक मिळवला आहे.


या गुणवंत विद्यार्थिनींचा संस्थेच्या वतीने भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, शालेय समितीच्या चेअरमन प्रा.ज्योतीताई कुलकर्णी, माजी चेअरमन डॉ. पारस कोठारी, नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे आदी उपस्थित होते.
ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, शिक्षणाने नुसती डिग्री मिळत नाही, तर माणसाचा विचार प्रगल्भ होतात. विचार प्रगल्भ झाल्यास तुमच्या वागण्या-बोलण्यात बदल होतो आणि तो विचार तुम्हाला जीवनात पदोपदी निर्णय घेण्यास सक्षम बनवतो. म्हणून शिक्षण फक्त नोकरीसाठी नसून, जीवन घडविण्याचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले.


शिरीष मोडक म्हणाले की, रात्र शाळेतील महिला विद्यार्थिनींनी उत्तम गुण मिळवणं ही साधी गोष्ट नाही, तर शिक्षणात मोठा खंड पडल्यावर पुन्हा अभ्यासाकडे वळणं हा एक धाडसी निर्णय असतो. घरातील जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी, सामाजिक बंधनं या सगळ्यांवर मात करत महिला स्वत:ची गुणवत्ता सिध्द करत आहेत. जेंव्हा शिक्षण घेण्याचा दृढ निश्‍चय घेतला जातो, तेंव्हा यश निश्‍चितच मिळते. या यशामागे केवळ विद्यार्थिनींचा दृढनिश्‍चय नाही, तर शिक्षकांनी दिलेले समर्पित मार्गदर्शनही तितकंच मोलाचं आहे. राज्यातील रात्र शाळेत टॉप 10 मध्ये 4 विद्यार्थिनींचा समावेश असणं हेच शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र शाळेत शिक्षक तळमळीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात. कठीण परिस्थितीतही गुरूंनी केलेले मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशामागचं खरं कारण असतं. म्हणूनच रात्र शाळेतील यश हे खऱ्या अर्थाने गुरूंचेच आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. तर बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी सारडा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन केले.


सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच वर्षभर शैक्षणिक मदत करणाऱ्या मासूम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निकिता केतकर, संचालक कमलाकर माने, युवराज बोराडे व एसएससी प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील यांचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी आभार मानले व शैक्षणिक वर्ष 2025-26 यावर्षीचे इयत्ता आठवी ते बारावी कला, वाणिज्य शाखेसह नवीन देणे सुरू झाल्याची माहिती सर्व विद्यार्थी, पालकांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली दुराफे यांनी केले. आभार अमोल कदम यांनी मानले.


ज्युनियर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलचा 12 बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
कला शाखा प्रथम- स्वाती दुंनगु-गोंधळी (65.50%)
द्वितीय- प्रशांत भिसे (62.50 %)
तृतीय- ऋतुजा दौंड-गवळी (62-17 %)


वाणिज्य शाखा प्रथम- वैशाली ओमासे-आंधळे (56.50%)
द्वितीय- मयुरी जाधव-कराळे (52.33%)
तृतीय- राकेश अष्टेकर (50.33%)


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा व माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाप्रसंगी महादेव राऊत, शरद पवार, मंगेश भुते, अशोक शिंदे, कैलास करांडे, अनुराधा दरेकर, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, संध्या डोईफोडे, मंगल बोरुडे, भाग्यश्री चरकू आदींसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *