भालसिंग यांचे स्वखर्चाने निस्वार्थपणे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी -डॉ. संतोष गिऱ्हे
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल कोल्हापूर येथे ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा उमंग फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे यांनी भालसिंग यांचा सत्कार केला. डॉ. गिऱ्हे म्हणाले की, एसटी बॅकेची नोकरी सांभाळून भालसिंग यांचे निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक असून, पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य होण्यासाठी त्यांचे उपक्रम माणुसकीच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना विजय भालसिंग म्हणाले की, कोणत्याही पुरस्कार व मान-सन्मानासाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य सुरु आहे. सामाजिक देणे लागते, हा उद्देश ठेवून प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले जात आहे. मिळालेला पुरस्कार व मान-सन्मान हा सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.