वेदोच्चाराने दुमदुमला मंदिर परिसर; आकर्षक विद्युत रोषणाईने लखलखाट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. बुधवारी (दि.1 ऑक्टोबर) संध्याकाळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांच्या हस्ते सपत्निक होम-हवन विधी पार पडला. वेदोच्चारांच्या गजरात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
मंदिर परिसरासह एमआयडीसी भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविधरंगी दिव्यांच्या झगमगाटामुळे परिसर लखलखाटला असून भक्तांचे लक्ष वेधत आहे.
श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी आयोजित धार्मिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ तसेच विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दररोज धार्मिक विधी, आरती आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. विद्युत रोषणाई, होम-हवन आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे एमआयडीसी परिसर भक्तिरसाने उजळून निघाला.