महिलांना निरोगी आरोग्य, आहार व योगाचे मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आंनद योग केंद्रात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. वर्षभर निरोगी आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या आंनद योग केंद्राच्या माध्यमातून महिलांना आरोग्य, आहार व योगबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या हळदी-कुंकू कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. डॉ. कल्पना ठुबे यांनी महिलांना निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन करुन स्त्रियांना होणारे आजार, त्याविषयी घ्यायची काळजी, त्यावरील उपचार यावर मार्गदर्शन केले. तर मुलगी वयात येताना होणारे हार्मोन्स बदलामुळे घ्यावयाची काळजी, स्तनाचे, गर्भाशयाचे वाढलेले कॅन्सरचे प्रमाण याबद्दल माहिती दिली. नियमित प्राणायाम, योगाने आत्मविश्वास व सकारात्मकता वाढते, ताणतणाव कमी होऊन संकटाना तोंड देण्याचे धैर्य निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनीता गुगळे यांनी गर्भसाधना या विषयावर प्रबोधन केले. गर्भ साधनेने चांगली संतती निर्माण होते. यासाठी आहार, विहार, शरीर शुद्धी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपेक्षा संकलेचा यांनी महिलांसाठी मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमासाठी उषा पवार, सोनाली जाधववार, मनिषा गायकवाड, प्रतिक्षा गीते, पूजा ठमके, स्वाती वाळुंजकर, संगीता जाधव यांनी परीश्रम घेतले.
