शिक्षण सप्ताहातंर्गत क्रीडा दिनानिमित्तचा उपक्रम
डोंगरे यांनी कुस्तीचे तर मिस्कीन हिने गोळा फेक, थाळी फेकचे दिले धडे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयामध्ये क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना कुस्ती व गोळा फेक, थाळी फेक या खेळाविषयी माहिती देऊन मैदानी खेळाचे महत्त्व सांगण्यात आले. जिल्ह्यात शिक्षण सप्ताह साजरा होत असताना क्रीडा दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ सुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व गोळा फेक व थाळीफेकच्या राष्ट्रीय खेळाडू विश्वेशा मिस्कीन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कुस्ती हा सर्वात प्राचीन खेळ असून, या खेळाने मन, शरीर व आरोग्य उत्तम राहते. कुस्ती खेळ हा फक्त मुलांसाठी नसून, मुली देखील यामध्ये आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. कुस्तीसाठी भरपूर कष्ट व सरावात सातत्य असावे लागते. या खेळात राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्या देखील मिळत असल्याचे स्पष्ट करुन कुस्तीसाठी व्यायाम, आहार व या खेळातील डावपेचाची त्यांनी माहिती दिली.

विश्वेशा मिस्कीन यांनी गोळा फेक व थाळी फेकमध्ये खेळाडूंना मोठी संधी आहे. मैदानी खेळाने आरोग्य सदृढ बनते. हे मान्यता प्राप्त खेळ असून, या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये देखील समावेश आहे. युवकांनी आवड असलेल्या खेळाकडे करियर म्हणून पाहण्याचे त्यांनी आवाहन केले. तर मिस्कीन यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना गोळा फेक व थाळी फेकचे प्रात्यक्षिक दाखवून शालेय मैदानी स्पर्धा कशा असाव्या? यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक आशिष आचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब घुंगार्डे यांनी केले. आभार आदम शेख यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयातील विजय देवकर, स्वाती अहिरे, कल्पना ठुबे, आशंका मुळे, प्रिया जाधव, भाग्यश्री वेताळ, पुष्पवर्षा भिंगारे, महेश मुळे आदी उपस्थित होते.