भारत रत्न सन्मान बहाल करण्याची मागणी
दलित, वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंचा सन्मान हा समाजाचा सन्मान -सुनिल सकट
नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास मातंग समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न सन्मान बहाल करण्याची मागणी केली.
माजी नगरसेवक मनेष साठे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय लहुजी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुनिल सकट, शासन पुरस्कारप्राप्त पोपटराव पाथरे, राजू घोरपडे, अशोक बागडे, पांडुरंग घोरपडे, संतोष शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात नवा विचार जागवला. दलित, शोषित, कामगार, वंचित यांच्या समस्या, वेदना, स्वप्ने आपल्या साहित्यातून त्यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांचा संघर्ष आणि साहित्य हा फक्त साहित्यिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक क्रांतीचा भाग आहे. दलित, वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंचा सन्मान हा समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
मनेष साठे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ कवी, लेखक नव्हते, तर ते समाजाचा आरसा होते. त्यांनी वंचित, उपेक्षित घटकांसाठी आपले संपूर्ण जीवन झोकून दिले. त्यांचे साहित्य सर्व समाजासाठी मार्गदर्शक ठरले आहे. त्यांना भारतरत्न देण्याची मागणी ही कोणत्याही एका समाजाची नसून, ती सर्व वंचित, कष्टकरी, कामगार समाजाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.