• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

मातृत्वाचा गौरव: ब्रह्मकुमारी संस्थेत मातृपूजनाने मदर्स डे साजरा

ByMirror

May 14, 2025
मातृत्वाचा गौरव: ब्रह्मकुमारी संस्थेत मातृपूजनाने मदर्स डे साजरा

राजयोगिनी राजेश्‍वरी दीदींच्या प्रमुख उपस्थितीत रंगला भव्य गौरव सोहळा

नगर (प्रतिनिधी)- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या सावेडी रोड, महावीर नगर येथील मुख्य केंद्रात मदर्स डेच्या निमित्ताने मातृत्वाचा गौरव करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी आईच्या रुपातील स्त्रीशक्तीला वंदन करत मातृपूजन करून मदर्स डे साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मकुमारी परंपरेतील आध्यात्मिकतेच्या पाश्वभूमीवर मातृत्वाचा गौरव करत एक सकारात्मक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात स्त्री ही विश्‍वाची सर्जनशक्ती आहे आणि तिचे मातृत्व हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक आहे! हा संदेश देण्यात आला.


या गौरव सोहळ्यास राजयोगिनी राजेश्‍वरी दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. त्यांच्या समवेत ब्रह्मकुमारी सुप्रभा दीदी, ॲड. निर्मला चौधरी, माजी नगरसेविका सुप्रिया जाधव, बी.के. नरेश नुती, बी.के. दीपक जोध, बी.के. साईनाथ श्रीगादी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मातांचा सामूहिक औक्षण करून त्यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित मातांना शुभेच्छा देत, त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग व प्रेमाची आठवण करून देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान भावनिक वातावरण निर्माण झाले होते.


मदर्स डे हा केवळ एक साजरा करण्याचा दिवस नसून, मातृत्वाची जाणीव, त्याग आणि प्रेमाचे स्मरण करून त्यांना मानाचा मुजरा करण्याचा एक पवित्र प्रयत्न आहे. धरतीमाता ज्याप्रमाणे अन्न निर्मितीतून प्रत्येकाची भूक भागवून पालण-पोषण करते, त्याप्रमाणे स्त्री माता देश निर्माण करते. ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून हा दिवस सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आल्याचे राजेश्‍वरी दीदी यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *