अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू कु. गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच ही स्पर्धा गुवाहाटी (आसाम) येथे सरूसजाई क्रीडा संकुलात होणार आहे.
या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गौरी गौड हिचा श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन मानधना व प्रशिक्षक उमेश झोटिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रणिता तारोटे, आप्पा लाढाणे, ऋतुजा वाल्हेकर, अक्षता गुंडपाटील उपस्थित होते.
गौरी न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, ती बी.बी.ए. द्वितीय वर्षात शिकत आहे. तर श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बालिकाश्रम रोड सावेडी येथील महावीर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटर येथे मागील दहा वर्षांपासून योगा व मल्लखांब या खेळाचा अविरत सराव करत आहे. यापूर्वी आंतरशालेय राज्यस्तरीय योगा स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच राष्ट्रीयस्तरावर एरिअल सिल्क या स्पर्धेत सलग तीन वर्ष तिने सुवर्ण पदक पटकाविले आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम मध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी तिचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
