• Fri. Sep 19th, 2025

केडगावला विश्‍वेश्‍वर सेवा प्रतिष्ठानची गणेश विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण

ByMirror

Sep 9, 2025

ढोल-ताशांच्या गजरात लेझीमचा जल्लोष, मानाच्या बैल गाडीतील बाप्पांनी वेधले लक्ष


पारंपारिक मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्सफूर्त सहभाग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील उदयनराजे नगरात विश्‍वेश्‍वर सेवा प्रतिष्ठान तर्फे गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने आणि उत्साहात पार पडली. या मिरवणुकीत ढोल पथकाच्या निनादात लेझीमचा डाव रंगला होता, तर गुलालाच्या उधळणीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.


भैरवनाथ दिंडीतील मानाच्या बैलजोडीच्या रथात श्री गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली होती. या रथाने सर्व गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. उद्योजक सचिन (आबा) कोतकर व विश्‍वेश्‍वर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सोलापूर येथील प्रसिद्ध शिवाई लेझीम पथक हे मुख्य आकर्षण ठरले. ढोल-ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! अशा गजरात वातावरण भारून टाकले.


वैष्णव नगर, शिवाजीनगर, भूषण नगर, एकनाथ नगर, मराठा नगर आणि उदयनराजे नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला व युवक वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती. पाहुण्यांनीही लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी डिजेला फाटा देत पारंपरिक ढोल-ताशांचा जल्लोष कायम ठेवण्यात आला.


या मिरवणुकीत भूषण गुंड, सचिन सातपुते, सागर सातपुते, नितीन आजबे, अक्षय तारू, राजू आंग्रे, राजू पवार, संकेत उरमुडे, मच्छिंद्र भांबरे, विक्रम कोतकर, महेश घोडके, प्रकाश इथापे, योगेश डोंगरे, बाबासाहेब कोतकर, सूरज कोतकर, विनय जगदाळे, विजय तेलोरे, कैलास बुक्कन, राहुल आंग्रे, संतोष नाना कोतकर, पोपट कराळे, मच्छिंद्र कोकाटे, विशाल सकट यांच्यासह कालिका प्रतिष्ठान, जय बजरंग प्रतिष्ठान, जगदंबा प्रतिष्ठान, विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


उद्योजक सचिन (आबा) कोतकर म्हणाले की, गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. आज डिजेच्या आवाजात परंपरा हरवत असताना आपण पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली, हे समाधान देणारे आहे. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा डाव आणि मानाच्या बैलजोडीच्या रथात विसर्जनासाठी सजलेली मूर्ती या सर्वामुळे मिरवणूक अधिकच भव्यदिव्य झाली. समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग हा गणेश भक्तीचे खरे दर्शन असल्याचे ते म्हणाले.


विश्‍वेश्‍वर सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले की, गणपती बाप्पा ही आपल्या घराघरात श्रद्धा, आनंद आणि उत्साह घेऊन येतो. प्रतिष्ठानतर्फे घेतलेल्या या मिरवणुकीत नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहून आमचा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. डिजेला फाटा देऊन पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढणे हा आमचा प्रयत्न असून, समाजातील तरुणांनी या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी. भविष्यातही अशा सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देऊन समाजात ऐक्य, बंधुता आणि सकारात्मकता रुजवण्याचे काम विश्‍वेश्‍वर सेवा प्रतिष्ठान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *