आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल विशेष सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील महिला पॉवरलिफ्टर अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी भूतान येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तब्बल दोन सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल जिम ‘स्ट्राईकर’तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या हस्ते मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वैभव तावरे व शाहरुख सय्यद उपस्थित होते.
संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशन (इंडू श्री ऑर्गनायझेशन) यांच्या वतीने आशियाई पातळीवरील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मिश्रा यांनी एकूण 350 किलो वजन उचलत विक्रमी प्रदर्शन करत दोन सुवर्ण पदके आपल्या झोळीत टाकली. त्यांच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक म्हणाले की, अनुराधा यांनी गेल्या काही महिन्यांपासून कष्टपूर्वक प्रशिक्षण घेतले. त्यांच्या कठोर परिश्रम, शिस्तबद्ध तयारी आणि ध्येयवेड्या वृत्तीमुळेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. भविष्यात त्या आणखी मोठी पदके जिंकतील असा विश्वास व्यक्त केला.
मिश्रा यांना याआधी ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा किताबही प्राप्त झाला असून त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीची ही दखल आहे. शहरातील महिला खेळाडूंना प्रेरणा देणारे आणि राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रोत्साहित करणारे हे यश ठरले असल्याचेही मंडलिक म्हणाले.
