• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहमदनगर कापड व्यापारी संघातर्फे नगरसेवकांचा सत्कार

ByMirror

Mar 6, 2026
अहमदनगर कापड व्यापारी संघातर्फे नगरसेवकांचा सत्कार

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा नगरसेवकांचा निर्धार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर कापड व्यापारी संघ, अहिल्यानगर यांच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. शहरातील ख्रिस्त गल्ली येथील सप्तक सदन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगरसेवकांचा गौरव करण्यात आला. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या शुभेच्छा व्यापारी संघटनेतर्फे देण्यात आल्या.


या सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश घुले, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगलताई लोखंडे, सुरेखाताई कदम, गणेश कवडे, सुभाष लोंढे, आशाताई डागवाले, अश्‍विनी गेनप्पा, शितलताई ढोणे, विपुल शेटीया, संजय चोपडा, परेश लोखंडे, किशोर डागवाले आणि संतोष गेनप्पा यांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष श्‍यामसुंदर सारडा होते. यावेळी उपाध्यक्ष सचिन चोपडा, सहउपाध्यक्ष राजेंद्रजी गांधी, सचिव मुकेशजी अरोरा, सहसचिव विजयजी गांधी, खजिनदार धीरज मुनोत यांच्यासह सचिन पेटकर, सचिन कटारिया, रजनीकांत गांधी, प्रशांत बोरा, प्रबल पटवा, जितेंद्र लड्डा, कपिल शहा, विजय गांधी, अक्षय मुनोत, हिम्मत शिंगी, रामेश्‍वर बलदवा, सतीश सुपेकर आदींसह कापड व्यापारी संघाचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष श्‍यामसुंदर सारडा म्हणाले की, शहराच्या प्रगतीत व्यापारी वर्गाचा मोठा वाटा आहे. शहरातील बाजारपेठा सुस्थितीत राहणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत असणे तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या वेळेवर सोडवणे आवश्‍यक आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यापारी वर्गाच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाशी समन्वय साधत सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


उपाध्यक्ष सचिन चोपडा यांनी सांगितले की, व्यापारी वर्ग हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि सूचनांना प्राधान्य देऊन त्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटना कायम प्रयत्नशील राहील. सर्वांच्या सहकार्याने शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रगत बनविण्याचा प्रयत्न होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनीही आपल्या मनोगतातून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. नगरसेवक अविनाश घुले म्हणाले की, “अहमदनगर कापड व्यापारी संघाने आयोजित केलेला हा सत्कार सोहळा आमच्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारीही देणारा आहे. नागरिकांनी दिलेला कौल हा केवळ विजय नसून शहराच्या विकासाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या अपेक्षांनुसार काम करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”


नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की, शहरातील व्यापारी वर्गाच्या अडचणी, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच बाजारपेठेतील नियोजन यांसारख्या प्रश्‍नांवर प्राधान्याने काम केले जाईल. प्रशासन आणि व्यापारी संघटनांमध्ये समन्वय ठेवून शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाच्या शेवटी मुकेश अरोरा यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कापड व्यापारी संघातील सर्व व्यापारी बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *