• Tue. Oct 14th, 2025

जगाच्या पाठीवर युध्दजन्य परिस्थितीचे स्पष्टीकरण; होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

ByMirror

Oct 9, 2025

निमगाव वाघाच्या होईकात पुन्हा चळवळीचे भाकित

मागील चळवळीचे भाकित आरक्षणाच्या मुद्दयांवरुन ठरले खरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे मंगळवारी (दि.7 ऑक्टोबर) झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळ होणार असल्याचे म्हणजेच सर्वच क्षेत्रात चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित यावर्षीही वर्तविण्यात आले. तर खंडात रक्ताचा पूर वाहणार म्हणजेच युध्दजन्य परिस्थिती राहणार व जेठुडी कठीण जाईल आणि काही ठिकाणी मोडघड होईल असे सांगण्यात आले.


होईकच्या या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील वर्षीचे चळवळीचे भाकित यावर्षी विविध आंदोलने, आरक्षणावरुन पेटलेले वातावरण व सोन्याचे भावाची उच्चांकीचे भाकित तंतोतंत खरे ठरले. मागील वर्षी लक्ष्मीला पिडा असल्याचे भाकित वर्तविण्यात आले होते, त्यानुसार यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होवून सर्वत्र शेतीचे नुकसान झालेले असल्याचे देखील समोर आले आहे. यावर्षी जगाच्या पाठिवर युध्दजन्य परिस्थितीचे भाकित वर्तविण्यात आलेले आहे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.


गावात पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आले. सकाळी बिरोबाच्या ओव्या सादर करण्यात आल्या. देवाचे भगत नामदेव भुसारे यांच्या अंगात वारे संचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अंगावर वेताचे फटके ओढून होईक (भविष्यवाणी) सांगितले.


होईकात ते म्हणाले की, बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला म्हणजेच पशु धनाला व शेतीला पिडा असल्याचे त्यांनी सांगितले. बाळाला यावर्षी संकट नसून, चित्ता सवातीचा तीन ते पाच दिवस आभाळ फिरेल. म्हणजेच काही ठिकाणी पाऊस पडेल व काही ठिकाणी पडणार नाही.


दिवाळीच दिपान अडीच ते पाच दिवस सर्वत्र आभाळ येऊन पाऊस पडेल. सटीच सटवानाने कर्मभागी पाऊस होईल. गायी देठाला लागून, नव तूप होणार. सध्याच्या पिकांना रोगराई असणार आहे. तर कापूस, गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर कल्याण कुर्तिकाचा सात खंडात नऊ ते अकरा दिवस आभाळ फिरुन पाऊस होणार. पेंढी पालखीत मिरल, आषाढी साधली जाणार म्हणजेच पाऊस होणार. तर ज्वारीची पेर होईल व गहू, हरभराची पेर होऊन त्याला अपकार होणार असल्याचे भाकीत सांगण्यात आले आहे.


गावातील होईकाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे, नामदेव जाधव, बाबासाहेब जाधव, गोकुळ जाधव, साहेबराव बोडखे, सागर कापसे, बबन कापसे, बाबा जाधव, बाबा पुंड, अंशाबापू शिंदे, संजय डोंगरे, संजय कापसे, ठकाराम शिंदे, बाळू भुसारे, युवराज भुसारे, पांडुरंग गुंजाळ, राजू भुसारे, अंबादास निकम, कचरु कापसे आदी उपस्थित होते. होईकासाठी आलेल्या पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *