जानव्ही लंघे कडून गोलची डबल हॅट्रिक
12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल व 14 वर्ष वयोगटात अशोकभाऊ फिरोदिया व ऑर्चिड स्कूलची बाजी
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (दि.4 सप्टेंबर) पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन, प्रतिस्पर्धी संघावर एकहाती विजय मिळवला. संघाची उत्कृष्ट खेळाडू जानव्ही लंघे हिने डबल हॅट्रिक करुन सर्वांचे लक्ष वेधले. 12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल व 14 वर्ष वयोगटात अशोकभाऊ फिरोदिया व ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलने बाजी मारली.
सकाळच्या सत्रात 17 वर्षा आतील मुलींमध्ये प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आयकॉन पब्लिक स्कूलचा सामना अटातटीचा ठरला. दोन्ही संघ शेवटच्या क्षणा पर्यंत गोल करण्याच्या तयारीत होते. मात्र दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. 0-0 गोलने हा सामना अनिर्णित राहिला.
12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात युवराज आहेर याने गोलचे हॅट्रिक करुन प्रवरा पब्लिक स्कूलला 3-0 गोलने विजय मिळवून दिला.
17 वर्षा आतील मुलींमध्ये डॉन बॉस्को विरुध्द पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात पोदार स्कूलच्या मुलींनी आक्रमक खेळी करुन एकामागोमाग तब्बल 7 गोल केले. यामध्ये जानव्ही लंघे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन डबल हॅट्रिक करण्याचा मान मिळवला. काव्या झावरे हिने 1 गोल केला. 0-7 गोलने पोदार स्कूलचा संघ विजयी झाला.
दुपारच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात (मुले) अशोकभाऊ फिरोदिया विरुध्द पीएम श्री केव्ही 1 यांच्यात झाला. यामध्ये आयुष गाडळकर याने 1 गोल करुन अशोकभाऊ फिरोदियाचा संघाला 1-0 गोलने विजय मिळवून दिला.
ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल विरुध्द तक्षिला स्कूलमध्ये देखील सामना रंगला होता. यामध्ये आरव भिसे याने 1 गोल करुन ऑर्चिड स्कूलचा विजय 1-0 गोलने निश्चित केला.