• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

आदिवासी कुटुबातील बालिकेची शोषणातून सुटका

ByMirror

Jul 10, 2024
आदिवासी कुटुबातील बालिकेची शोषणातून सुटका

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाची कामगिरी

पंधरा हजार रुपयात विकत घेतलेल्या मुलीकडून करुन घ्यायचे कबाडकष्ट

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हसणे खेळण्याच्या वयात शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या अल्पवयीन आदिवासी कुटुंबातील मुलीला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी सुटका केली. पंधरा हजार रुपयात विकत घेतलेल्या व अनेक वर्षापासून शोषित जीवन जगणाऱ्या मुलीला शोषणापासून मुक्तता मिळाली आहे. संस्थेच्या वतीने पिडीत, शोषित बालकांना शोषणातून मुक्त करण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून, या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.


पारनेर तालुक्यातील काही गावांत गरीब, दारिद्य्र, अशिक्षित, दुर्बल, आदिवासी कुटुंबातील 10 बालकांची तस्करी करुन त्यांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक व लैंगिक शोषण होत असल्याची माहिती श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली होती. त्यानंतर गुंजाळ यांनी संस्थेच्या पथकास याबाबत माहिती दिली. माहितीची खातरजमा करुन दिलीप गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, ऋतिक बर्डे, मथुरा जाधव यांनी गोपनीय पद्धतीने काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. त्यात एक आदिवासी कुटुबातील 13-14 वर्षाची मुलगी आढळून आली. गेली तीन-चार वर्षापासून ही मुलगी काकणेवाडी या ठिकाणी दिवस रात्र कष्ट करत होती. तिला पंधरा हजार रुपयात विकत घेऊन बंदिस्त केल्याचे प्राथमिक माहिती समजली.
हसणे खेळण्याच्या वयात या मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवून, मानसिक, आर्थिक शोषण होत असल्याचे आढळून आले. बालिकेला विचारणा केली असता, तिला नाव व कुटुबाची माहिती सांगता येत नव्हती. मात्र सदर बालिका आदिवासी कुटुबातील आहे आणि सध्याचा त्यांचा पत्ता, संपर्क माहित नसल्याचे आरोपी भाऊसाहेब वाळुंज यांनी सांगितले.


श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे स्वयंसेवक सिराज शेख व संस्थेच्या पथकाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. पोलीस अधिक्षक ओला यांनी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्यासोबत बैठक घेऊन बालिकेची सुटका करण्याचे आदेश दिले. जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे समीर सय्यद, अनिता पवार, अर्चना काळे, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने तुषार बोरसे, कल्याण लगड, ल.प्र. दाभाडे, महसूल विभागातर्फे तलाठी ए. एन शेलार यांनी सहकार्य केले.


श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे दिलीप गुंजाळ, सिराज शेख, गोरख जाधव, केलविन, अनिल, ऋतिक बर्डे, मंगेश थोरात, मथुरा जाधव या पथकांनी धाड टाकून बालिकेची सुटका केली. पारनेर पोलीसांनी आरोपी भाऊसाहेब वाळुंज यांच्यावर गुन्हा दाखल करुन बालिकेला अहमदनगर येथील निरीक्षण गृहात दाखल केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *