मानवी आकाशकंदीलाच्या प्रतिकृतीने वेधले लक्ष; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा अनोखा आविष्कार
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कोपरगावचा उपक्रम
कोपरगाव (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, कोपरगाव येथे कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, कलात्मकतेचा आणि पर्यावरण जागृतीचा सुंदर संगम घडवून आकर्षक आकाश कंदील तयार केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थर्माकॉल, प्लास्टिक किंवा रासायनिक रंगांचा वापर न करता कागद, कापड, बांबूच्या काड्या आणि टाकाऊ वस्तूंचा योग्य उपयोग करून पूर्णतः पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यात आले. या कृतीतून दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरली विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी आकाशकंदील प्रतिकृती. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष मानवी शृंखलेच्या माध्यमातून आकाशकंदीलाचे रूप साकारले. यामधून एकता, सहकार्य आणि सर्जनशीलतेचा सुंदर संदेश देण्यात आला.
प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर शिवाजीराव लंके यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीने व पर्यावरणपुरक पध्दतीने सण अधिक उत्साहाने साजरा होत असल्याचा संदेश दिला.
या प्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ लव्हाटे, पर्यवेक्षक बाळकृष्ण कोल्हे, रमेश दाणे, संभाजी आरोटे, बालाजी जाधव, नारायण चौरे, गोरख सोनवणे, तसेच विभाग प्रमुख राजश्री बडे, उर्मिला घुले, कावेरी वलटे, मंजुषा कुमावत, प्राजक्ता राणे, मीना पावले, माया बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील विद्यालयाच्या सभागृहात प्रदर्शित करण्यात आले. पालक आणि उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जाणीव, कलात्मक दृष्टिकोन निर्माण होणार असल्याची भावना विकसित होणार असल्याची भावना शिक्षकवर्गाने व्यक्त केली.