• Sat. Oct 25th, 2025

रुग्णालयातील नातेवाईक व रस्त्यावरील वंचितांची दिवाळी घरघर लंगर सेवेने केली गोड

ByMirror

Oct 25, 2025

वंचितांच्या अंगणात उजळला आनंदाचा दिवा; घरघर लंगर सेवेचा दिवाळी उपक्रम


रुग्णालयातून रस्त्यापर्यंत दिवाळी प्रकाशमय करुन लंगर सेवेने दिला प्रेमाचा संदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा रुग्णालय, विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये राहणारे, रस्त्यावर उघड्यावरचे जीवन जगणाऱ्यांच्या अंगणात दिवे प्रज्वलीत करुन घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. दिवे प्रज्वलीत करून, फुलझड्यांची आतषबाजी करत आणि फराळाच्या पाकिटांचे वाटप करून समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलीत करण्यात आला.


घरापासून दूर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जिल्हा रुग्णालय परिसरात विशेष दिवाळी साजरी करण्यात आली. लंगर सेवेच्या सेवादारांनी नातेवाईकांना रुग्णालया बाहेर बोलावून एकत्रित फुलझड्या पेटवून उत्सवाचा आनंद घेतला आणि त्यांना दिवाळी फराळ भेट म्हणून दिला. यावेळी सर्वांसाठी सदृढ आरोग्य व सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात आली.


शहरातील विविध रस्त्यांवर फेरीवाले, लहान व्यवसाय करणारे व पालांमध्ये राहणारे कुटुंब या उपक्रमात सहभागी झाले. लंगर सेवेच्या सेवादारांनी त्यांच्या झोपड्यांमध्ये जाऊन दिवे पेटवले, फटाक्यांची आतषबाजी करुन फराळाचे पाकिट वितरित करण्यात आले. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या या प्रेमळ भेटींनी वंचित वर्ग भारावून गेला. या उपक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटकाला दिवाळीचा आनंद मिळावा, हा संदेश घर घर लंगर सेवेने प्रत्यक्ष कृतीतून दिला.


या दिवाळी पाडव्याच्या दिवशी झालेल्या उपक्रमात हरजितसिंह वधवा, करनसिंग धुप्पड, राजा नारंग, कैलाश नवलानी, सुनील थोरात, दलजीतसिंह वधवा, सिमरजीतसिंह वधवा, लिओ गुरनूरसिंग वधवा, प्रशांत मुनोत, हर्ष कित्हानी, रीत जाजू, आहिल शेख आदी लंगर सेवेचे सेवादार सहभागी झाले होते.


कोरोनाच्या काळात गरजू व भुकेल्या नागरिकांना अन्न व मदत पोहोचविणाऱ्या घर घर लंगर सेवेने गेल्या काही वर्षांपासून वंचित घटकांपर्यंत सणांचा आनंद पोहोचवण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा नव्हे तर आनंद वाटण्याचा सण आहे, या भावनेने हा उपक्रम राबवला जातो. लंगर सेवेच्या या कार्यातून माणुसकीचा आणि करुणेचा दिवा समाजात प्रज्वलित करण्यात आला आहे. या सामाजिक उपक्रमासाठी जनक आहुजा, प्रिथपालसिंग धुप्पर, सतीश गंभीर, गुलशन कंत्रोड, राजू जग्गी, राजेंद्र कंत्रोड, राहुल बजाज, अभिमन्यू नय्यर आदींनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *