सप्तसूर फाउंडेशनचा सुरेल सोहळा!
सुरेल, दर्जेदार आणि अविस्मरणीय गाण्यांची मैफल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरातील सप्तसूर फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त सुरेल, दर्जेदार आणि अविस्मरणीय गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीचा कार्यक्रम दिवाळी सांजवेळी या नावाने रविवार (दि. 19 ऑक्टोबर) रोजी संध्याकाळी 6 वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमात मराठी व हिंदी भाषेतील अनेकविध गाण्यांचा सुरेल मेळ साधण्यात येणार असून युगलगीते, लोकगीते, भावगीते आणि गझल अशा विविध प्रकारच्या गाण्यांचा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने दर्जेदार कार्यक्रम सादर करून सप्तसूर फाउंडेशनने नगरातील संगीतप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या फाउंडेशनचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व कलाकारमंडळी आपापल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून संगीताचा आनंद रसिकांपर्यंत पोहोचवतात. समाजात कलावंत डॉक्टर म्हणून ही मंडळी ओळखली जातात.
यंदा दिवाळीच्या सुट्टीत संध्याकाळी सादर होणाऱ्या या कार्यक्रमामुळे दिवाळीची सांज गीतांनी बहरणार आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात सुरेल गाण्यांची फुलझड उडवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, उपस्थित श्रोत्यांनी वेळेवर येऊन या सुरेल संध्याकाळचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेशिकेसाठी डॉ. शिरीष कुलकर्णी: 8788964795, डॉ. अविनाश वारे: 9960064500 व सौ. पल्लवी जोशी: 9423783080 यांना संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
