युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम; वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना आनोखी दिवाळी भेट
दिवाळी म्हणजे फक्त प्रकाश नव्हे, तर मनांमधील आपुलकीचा सण -रोहित काळोखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा एकसाथ फाउंडेशनने विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसह दिवाळी साजरी केली. वृध्दाश्रमात युवक-युवतींनी आनंदाचा दिवा पेटवून संपूर्ण वातावरण आनंदाने भारावून टाकले. दिवाळीच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना आपुलकीने दिवाळी भेट देऊन, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
दिवाळीच्या दिवशी आपल्या कुटुंबासह सण साजरा करण्याची सवय असलेल्या अनेक ज्येष्ठांना आज काही कारणांमुळे वृद्धाश्रमात राहावे लागते. पण या दिवशी जेव्हा हे तरुण त्यांच्याशी प्रेमाने बोलले, गप्पा मारल्या, भेटवस्तू दिल्या, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपल्या कुटुंबातीलच कोणी दिवाळीला भेटायला आले, अशी भावना त्यांच्या मनात दाटून आली.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित काळोखे, सचिव सुमित भिंगारदिवे, कार्याध्यक्ष प्रिती क्षेत्रे, उपाध्यक्ष संदेश कानडे, राज जाधव, महेश साठे, प्रितेश मोहिते, टेरी वाघमारे, हर्ष शिरसाठ, श्रावणी घोडके, ऋग्वेद घोडके, शार्दुल लोखंडे, वैभव गारुडकर, प्रशांत कनगरे, वैभव गुढेकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमादरम्यान वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दैनंदिन वापराच्या वस्तू, फळे, मिठाई वाटण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन दिवे लावले, गाणी गायली, आठवणींना उजाळा दिला आणि काही हलकेफुलके खेळही खेळले. या क्षणांनी वृद्धाश्रमातील वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. दिवाळीचा सण त्यांच्या मनात पुन्हा एकदा उजळला.
रोहित काळोखे म्हणाले, की, दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा नाही, तर मनामनांतील आपुलकीचा सण आहे. समाजात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक तरुणाने अशा कार्यात सहभाग घ्यावा, कारण वृद्धांचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. आजच्या तरुणांनी सोशल मीडियावर साजरे होणारे सण थोडे बाजूला ठेवून प्रत्यक्षात कोणाच्या जीवनात प्रकाश नेण्याचे काम करावे, हाच दिवाळीचा खरा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
