वाडियापार्कला 9 जुलै पासून रंगणार तीन दिवसीय स्पर्धा
जिह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- शहरात रायसोनी फाउंडेशनच्या वतीने योनेक्स सनराईझ जी.एच. रायसोनी मेमोरियल जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. दि.9, 10 व 11 जुलै दरम्यान वाडियापार्क बॅडमिंटन हॉल मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा 11 वर्षं वयोगटापासून ते खुल्या गटापर्यंत असणार आहे. 17 व 19 वर्ष आतील मुले व मुली आणि खुला गट मुले व मुली यांची एकेरी व दुहेरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आहे. 11, 13 व 15 वर्ष आतील मुले-मुली यांची एकेरी व दुहेरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
नाव नोंदविण्याची शेवट 7 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. ही स्पर्धा फक्त अहिल्यानगर जिल्हा मधील खेळाडूंसाठी असणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शन व नियमानुसार ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्य संघटनेकडून तांत्रिक समिती येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरून आपला सहभाग नोंदवण्याचे म्हंटले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सचिव मिलिंद कुलकर्णी यांच्याशी 9423162632 संपर्क साधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.