बालघर प्रकल्पाच्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित घटकातील मुलांना आधार देऊन समाजात उभे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक जाणीव ठेऊन प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील काही वाटा गरजूंच्या शिक्षणासाठी खर्च केल्यास समाजाची प्रगती साधली जाणार आहे. तर गरीब- श्रीमत ही दरी दूर करण्यासाठी दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी प्रभावीपणे कार्य करावे लागणार आहे. अशा घटकातील विद्यार्थ्यांकडे कमीपणाने न पाहता त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते इंजि. अजित घोडके यांनी केले.

तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांना इंजि. घोडके यांनी स्कूल बॅगचे वाटप केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, लेखक रुपचंद शिदोरे, बालघर प्रकल्पाचे संस्थापक युवराज गुंड, संजय जाधव, मुख्याध्यापिका सरला राळेभात, संजय लोखंडे आदींसह बालघर मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळे समाज सावरला आहे. इंजि. घोडके सातत्याने गरजूंसाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. बांधकाम व्यवसाय सांभाळून त्यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. युवराज गुंड यांनी बालघर प्रकल्पाची माहिती देऊन वंचित मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले.
