बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज सेवाभावी संस्थेचा सामाजिक उपक्रम
14 एप्रिल ही केवळ जयंती नसून, सर्व समाजासाठी प्रेरणादायक दिवस -सुनील क्षेत्रे
नगर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेतर्फे डीएसपी चौकाजवळील सम्बोधी विद्यार्थी वस्तीगृहात सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
सुनील क्षेत्रे म्हणाले की, 14 एप्रिल ही केवळ जयंती नसून, ती एक प्रेरणादायक दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दलित, मागासवर्गीय, गरीब, शोषित आणि महिलांच्या उत्थानासाठी अर्पण केले. ते केवळ कायदेतज्ज्ञ नव्हते, तर एक महान अर्थशास्त्रज्ञ व समाजसुधारकही होते. महिला सक्षमीकरण, सामाजिक समता, शिक्षणाचा प्रचार आणि अधिकारांची जाणीव यासाठी बाबासाहेबांनी दिलेला लढा आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी वस्तीगृहाचे अधीक्षक नितीन कसबेकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन साळवे, रवींद्र तपासे सर तसेच इतर कार्यकर्ते आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.