• Fri. Sep 19th, 2025

तीन महिन्यांचे असिस्टंट ड्रेस मेकरचे प्रशिक्षण घेतलेल्या महिला-युवतींना प्रमाणपत्राचे वितरण

ByMirror

Jun 10, 2025

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न महिला सक्षमीकरणातून साकारले जाणार -रवीकुमार पंतम

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थेचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांनी स्वत: सक्षम व्हावे. शासनाच्या वतीने महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले असून, महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहे. जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण सुरु आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न महिला सक्षमीकरणातून साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले.


भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पाईपलाईन रोड, भिस्तबाग, कसबे मळा येथे महिला व युवतींना तीन महिन्यांचे असिस्टंट ड्रेस मेकरचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी पंतम बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधिकारी हिम्मत टाकळकर, प्रशिक्षिका ममता गड्डम, रेणुका कोटा, रश्‍मी पालवे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 40 महिला व युवतींना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच पुढील नवीन बॅचचे दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांना विविध फॅशन डिझाईनचे व शिवणकलेचे कौशल्य शिकवले जात आहे.


बाळासाहेब पवार म्हणाले की, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम जनशिक्षण संस्था करत आहे. 2005 पासून शहरात विविध व्यावसायिक प्रशिक्षण महिला व युवतींना दिले जात आहे. वर्षाला दीड हजार पेक्षा जास्त महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे काम केले जात आहे. ग्रामीण भागातही प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात असून, प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग व प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


या प्रशिक्षणासाठी संस्थेचे चेअरपर्सन उषाताई गुंजाळ, संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेश्‍याम गुंजाळ, व्हाईस चेअरमन विजय इंगळे, व्यवस्थापकीय कमिटी सदस्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *