सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सामाजिक उपक्रम
सामाजिक भाव जपून संवेदनशीलतेचा उत्सव साजरा; निराधार मुलांच्या रंगलेल्या चेहऱ्यावर फुलले चैतन्य
नगर (प्रतिनिधी)- निराधार व वंचित घटकातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील मुलांसह धुळवड साजरी केली. समाजातील घटक असलेल्या निराधार मुलांना देखील या सणाचा आनंद देण्यासाठी त्यांच्यासह रंग खेळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
वंचित घटकातील मुलांनी देखील एकमेकांवर रंगाची उधळण करुन धमाल केली. पाणी विरहीत व पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगांचा वापर करुन मुलांनी धुळवडचा आनंद घेतला. या उत्सवातून सामाजिक भाव जपून संवेदनशीलतेने उत्सव साजरा करण्यात आला. दु:ख, गरिबी याची सावली पडलेल्या या वंचित मुलांच्या आयुष्यात धुळवडीने रंग भरला. त्यांच्या रंगलेल्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह यामुळे सगळे वातावरण चैतन्यमय झाले होते.
या उपक्रमास आश्रमाचे संस्थापक ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आश्रमचे उपाध्यक्ष प्रकाश मेहेत्रे, सचिव ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली आढाव, व्यवस्थापिका निकिताताई आढाव, संचालिका राणीताई मेहेत्रे आदी उपस्थित होत्या.श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात पंचवीस मुला-मुलींचा सांभाळ केला जात आहे. शासनाचा कुठलाही अनुदान नसताना ह.भ.प. कृष्णानंद महाराज किर्तन प्रवचन सेवेतून अनाथ मुलाचे उज्वल भविष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत. शालेय शिक्षण व धार्मिक शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचे कार्य सुरु आहे.
अनाथ आश्रमात वाढणाऱ्या मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने धुळवड साजरी करण्यात आली. अनाथ मुले समाजातील एक घटक असून, मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकानी हातभार लावण्याची गरज आहे. या मुलांना आपुलकीने जवळ केल्यास त्यांच्या जीवनात एक समाधान निर्माण होणार आहे. -विजय भालसिंग (सामाजिक कार्यकर्ते)