विकासकामे रखडलेलीच; प्रशासनाविरोधात ग्रामस्थ संतप्त
प्रा. डॉ. दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (दि.29 डिसेंबर) उपोषण करण्यात आले. माजी उपसरपंच प्रा. डॉ. दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून, या आंदोलनात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
देहरे गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे व सामाजिक न्यायाशी संबंधित प्रश्नांबाबत यापूर्वीही वेळोवेळी लेखी निवेदने देण्यात आली आहेत. तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, तरीदेखील शासन व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या उपोषणात गावाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित तसेच विविध समाजघटकांच्या न्याय्य हक्कांशी निगडित मागण्यांवर भर देण्यात आला आहे. भुयारी मार्ग व अंतर्गत रस्त्यांचे काम तातडीने सुरू करणे, उड्डाण पुलामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे, तसेच एमआयडीसी बुस्टर जलउदंचन केंद्रासाठी दिलेल्या जागेच्या बदल्यात ठरल्याप्रमाणे गावाला पाणी कनेक्शन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मातंग समाजाच्या स्मशानभूमीची अधिकृत नोंद करणे, हरिजन समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामदैवत श्री मांगिरबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
गावातील अनेक कुटुंबे विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असून, रेशन कार्ड बंद असलेल्या कार्डधारकांसाठी गावात विशेष शिबिर घेऊन रेशनकार्ड सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी गाळ्यांचा प्रस्ताव तयार करून तो तातडीने मंजूर करावा, द.व.सु. योजनेचा दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्व. दत्तात्रय जाधव (ग्रामपंचायत कर्मचारी) यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस ग्रामपंचायतीत नोकरी देऊन कुटुंबाला न्याय द्यावा, तसेच रमाई आवास योजनेचे दीड वर्षांपासून प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दलित वस्तीतील (लहुजी नगर) धोकादायक अवस्थेत असलेली पाण्याची टाकी तातडीने हटवून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणीही उपोषणादरम्यान करण्यात आली. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
