प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर लिंबू-पाणी देत उपोषणाची सांगता
प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. माजी उपसरपंच प्रा. डॉ. दिपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होते. प्रशासनाच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी सारंग दुगम यांनी लेखी पत्र देत लिंबू-पाणी देऊन उपोषण सोडविले.
देहरे गावातील विविध विकासकामे, शासकीय योजना व मूलभूत सुविधांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 29 डिसेंबर) उपोषणास प्रारंभ केला होता. या आंदोलनात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली. तलाठी एस. एन. मोरे व ग्रामविकास अधिकारी कृष्णा बडे यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. यामध्ये रेशनकार्ड बंद असलेल्या कार्डधारकांचे रेशनकार्ड सुरू करण्यासाठी 19 जानेवारी रोजी गावात विशेष कॅम्प घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच रमाई आवास योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय मातंग समाज व हरिजन समाज बांधवांच्या स्मशानभूमीचा प्रश्न स्वतः जातीने लक्ष घालून सोडवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. एमआयडीसी बुस्टर जलउदंचन केंद्राला दिलेल्या जागेच्या बदल्यात देहरे गावाला नळ कनेक्शन देण्यासाठी म.औ.वि.म.चे उपअभियंता यांच्याकडून प्रस्ताव सादर केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
उपोषणार्थींच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले. यावेळी व्ही. डी. काळे (पंचायत समिती सदस्य), सुभाष खजिनदार (माजी सरपंच), प्रकाश धनवटे (माजी सरपंच), हबीब शेख (प्राचार्य), रमेश पाटील काळे (माजी चेअरमन), शिवाजी लांडगे (माजी चेअरमन), उत्तम काळे (माजी चेअरमन), अब्दुल खान (माजी सरपंच), दत्तू धनवटे (माजी चेअरमन), शिवाजी जाधव, रोहिदास जाधव, नवनाथ जाधव (भगत), किशोर जाधव, नंदकिशोर जाधव, भाऊसाहेब ढोकणे, रमेश काळे, बाप्पू चोर, शुभम पुंड, दत्तात्रय खजिनदार (माजी संचालक) यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
