• Mon. Oct 27th, 2025

स्नेहालयात वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा

ByMirror

Oct 27, 2025

पणत्यांच्या झगमगाट, आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळले आसमंत; विविध खेळ व नृत्याद्वारे वंचितांची धमाल


विविध संस्थेतील बालगोपालांसह वृध्दाश्रमातील आजी-आजोबांचा सहभाग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने सलग अठराव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील मुलांसह दीपोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळलेले आसमंत तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या दीपोत्सवात स्नेहालयासह शहरातील आरएचईबी, बालभवन, बाबावाडी, बालगृह प्रकल्प, आनंद प्रेम संस्था, मानस ग्राम प्रकल्प, हिम्मत ग्राम प्रकल्प, बालगृह टाकळी, शासकीय बालगृह मधील विद्यार्थी व मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोबा देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने हा दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येत असतो. फिल्म फेयर विजेता कामोद खराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. एस.एस. दीपक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहनलाल मानधाना, ॲड. अनुराधा येवले, डॉ. व्यंकटेश मुळे, लायन्सचे अध्यक्ष डॉ. संजय असनानी, सचिव प्रशांत मुनोत, प्रकल्प प्रमुख हरीश हरवानी, संतोष माणकेश्‍वर, किशोर रंगलानी, ओम किरण भंडारी, लिओ क्लबचे अध्यक्ष गुरनूर वधवा, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, श्‍याम असावा, बंदिष्टी, राजीव गुजर, मिलिंद कुलकर्णी, सपना असावा, हनीफ शेख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. संजय असनानी म्हणाले की, वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाचे अठरावे वर्ष असून, लायन्स क्लब मधील प्रत्येक सदस्य सेवाभावाने स्वतःला झोकून समाज घडविण्याचे कार्य करत आहे. या सेवा कार्यात लिओच्या युवक-युवतींनी देखील सामाजिक भावनेने योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. लिओ क्लबचे अध्यक्ष गुरनूर वधवा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.


मोहनशेठ मानधना म्हणाले की, स्नेहालय वंचित, उपेक्षितांसाठी आधारवड बनला आहे. तर या वंचित उपेक्षितांना मायेची सावली देण्याचे काम लायन्स क्लब करत आहे. दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्याचे कार्य म्हणजे एकप्रकारे राष्ट्र सक्षमीकरणाचे कार्य आहे. आपली दिवाळी साजरी करताना उपेक्षित वर्गाची दिवाळी देखील आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे साजरी करण्याची लायन्सची परंपरा प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.


कामोद खराडे म्हणाले की, सिनेमानिमित्त जगभर फिरत असताना नगरकरांनी उभे केलेले समाजकार्य सर्वांसाठी स्फुर्ती देणारे आहे. सामाजिक संवेदना जागृक ठेवून स्नेहालय, लायन्स क्लब व घर घर लंगर सेवे सारखे मोठे सामाजिक प्रकल्प उभे राहिले आहे. योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी एकत्र आल्यास स्वर्ग निर्माण होते. हे या सामाजिक उपक्रमातून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. एस.एस. दीपक लहान बालकांना मोठे होऊन भारत जोडण्याचे काम करायचे असल्याचे स्पष्ट करुन, बियांच्या गोष्टीतून समाजाला उपयोगी येण्याचे व स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा संदेश दिला.


प्रारंभी स्नेहालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रम रंगात आल्यावर डिजेच्या तालावर बालगोपालासह उपस्थित पाहुण्यांनी गीतांवर ठेका धरला होता. यावेळी बाँड ट्रिल म्यूजिक अकॅडमीचे अजितसिंह वधवा यांनी आपल्या सहकलाकारांसह बहारदार हिंदी-मराठी गीत सादर केले. या मेळाव्यात मुलींनी हातावर मेहंदी, मुलांनी टॅटू काढून विविध खेळांचा आनंद लुटला. तर विद्यार्थ्यांना चित्रपट देखील दाखविण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी जोडो जोडो भारत जोडो… नफरत छोडो, भारत जोडो…च्या घोषणा दिल्या.


संध्याकाळी स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता. तर फटाक्यांच्या आतषबाजीने व आकाश दिव्यांनी आसमंत उजळून निघाले. या धमालमय कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना वडा पाव, खाऊ, चॉकलेट, आईस्क्रिमसह भोजनाची मेजवानी होती. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल रंगलानी यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरजितसिंह वधवा, सिमरन वधवा, सुनील छाजेड, भावना छाजेड, मानसी असनानी, प्रणिता भंडारी, प्रिया रंगलानी, जपज्योतसिंह बग्गा, हर्ष किथानी, तनिष जग्गी आदींसह गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान, स्नेहालय परिवार, बालभवन व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *