अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 70 हजार मदतीची मागणी
सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी व जिल्हा सचिवांची बैठक नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली असल्याची माहिती भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी दिली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी होते. मागील दोन महिन्यांपासून विशेषतः पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारी आकडेवारीनुसार 27 लाख हेक्टर शेती बाधित झाली असली, तरी प्रत्यक्षात 70 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली. शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनावरे व माणसांची प्राणहानीही झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पंजाबसारख्या तुलनेने लहान राज्याने अलीकडील पूरस्थिती हाताळत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पंजाबपेक्षा मोठ्या असलेल्या महाराष्ट्रात परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. महाराष्ट्राचे भाजपचे मुख्यमंत्री कॉर्पोरेट घराण्यांना अदानी, अंबानी यांना सढळ हाताने मदत करतात, परंतु अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र केवळ 8 रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था स्पष्ट करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व जनसंघटना 4 ते 9 ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे अहवाल तयार करतील. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको, मोर्चे व आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर 70 हजार रुपये तातडीची मदत, तसेच फळबागा, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू आणि पूरक उद्योगांचे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जाणार आहे.
शिक्षणतज्ञ व पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या एनएसए कायद्यान्वये झालेल्या अटकेचा निषेध या बैठकीत करण्यात आला. यासंदर्भात 6 ऑक्टोबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान 11-12 ऑक्टोबर रोजी मुंबईत पक्षाची राज्य कौन्सिल बैठक होणार असून, यामध्ये अन्य काही महत्वाच्या विषयावर चर्चा केली जाणार असल्याचे कॉ. सुभाष लांडे यांनी म्हंटले आहे.