• Tue. May 5th, 2026

तीन सुवर्णांसह ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र 2026’किताब पटकाविल्याबद्दल गौरव

ByMirror

May 4, 2026

अनुराधा मिश्रा यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान

मिश्रा यांनी शहराचे नाव उंचावले -संपत बारस्कर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्ण पदके पटकावली. यासोबतच त्यांना ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र 2026’ हा मानाचा किताबही बहाल करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपत बारस्कर यांच्या हस्ते मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरंडे सर, दिपक दहे, कारभारी शेंडे, मेजर सचिन पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुराधा मिश्रा यांनी पॉवरलिफ्टिंग, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या तिन्ही प्रकारांमध्ये दमदार प्रदर्शन करत सुवर्ण पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, अनुराधा मिश्रा यांनी यापूर्वीही आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

संपत बारस्कर म्हणाले की, अनुराधा मिश्रा यांनी पॉवरलिफ्टिंगसारख्या कठीण क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे, ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र’ हा किताब पटकावून अहिल्यानगर शहराचे नाव उंचावले असल्याचे स्पष्ट करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *