सोमवार पासून भुईकोट किल्ला मैदानात रंगणार फुटबॉल निवड चाचणी
सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. भुईकोट किल्ला मैदान येथे सोमवार (दि.21 ऑक्टोबर) पासून निवड चाचणीला प्रारंभ होणार आहे. या निवड चाचणीद्वारे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होणार आहे. असोसिएशनचे सचिव रौनप फर्नांडिस यांच्या उपस्थितीमध्ये 18 खेळाडूंची संघात निवड होणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये तज्ञ फुटबॉल प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. निवड झालेला जिल्ह्याचा संघ शिरपूर (धुळे) येथे 5 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.
यामध्ये 1 जानेवारी 2010 नंतर किंवा 31 डिसेंबर 2011 च्या पूर्वी जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार नाही. खेळाडूंना त्यांचा मूळ जन्म प्रमाणपत्र आणि सोबत आधारकार्ड, पासपोर्ट आणणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जेव्हिअर स्वामी, तर सहाय्यक प्रशिक्षक वैभव मनोदिया राहणार आहे. निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी राजू पाटोळे, प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ प्रयत्नशील आहेत.
