• Fri. Sep 19th, 2025

पारंपरिक वाद्यांच्या गजरात गौरी-गणपतीची रंगली मिरवणूक

ByMirror

Sep 1, 2025

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने वेधले लक्ष

महालक्ष्मी मातेच्या जयघोषाने दुमदुमले नगर

नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (दि. 31 ऑगस्ट) शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गौरी-गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. परंपरेप्रमाणे महिलांनी व युवतींनी एकत्र येऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. आडत व्यापारी गणेश लालबागे परिवार तसेच नातेवाईक व आप्तेष्टांच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली होती.


मिरवणुकीला मल्हार चौक येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी गौरी-गणपतींचे मुखवटे घेऊन सहभागी होत, वाद्यांच्या ठेक्यावर फुगड्यांचा फेर धरला होता. यावेळी ढोल, ताशा, झांजांच्या गजरात महालक्ष्मी मातेचा जयघोष करण्यात आला. गौरी-गणपती बाप्पा मोरया…च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या मिरवणुकीतून परंपरा, स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला.


या मिरवणुकीत मोनिका गणेश लालबागे, प्रतिभा साखरे, नंदा नवले, तनु साखरे, नेहा लालबागे, प्रिया लालबागे, सायली मेहेत्रे, रेवती भुतारे, आरती लोंढे, रूपाली भुतारे, धनश्री गुजर, रचना पवार, सुवर्णा आगरकर, सविता मेहेत्रे, निक्षीता भुतारे, पूजा चौधरी, शीतल चिपाडे, छाया लालबागे, राणी लालबागे, दीपा चिपाडे, वैशाली पुंड, मोहिनी शिंदे, छाया कानडे यांच्यासह परिसरातील महिला, युवती व युवक उत्साहाने सहभागी झाले होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा मिरवणुकीचा खास आकर्षणबिंदू ठरला.


मिरवणुकीचे मार्गक्रमण होत असताना ठिकठिकाणी भाविक व स्थानिक नागरिकांनी गौरी-गणपतींचे स्वागत केले. मिरवणुकीत सहभागी मुखवट्यांचे पूजनही करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वे स्टेशन परिसरातून मार्गक्रमण करत आनंदनगर येथे मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणुकीनंतर लालबागे परिवाराच्या वतीने गौरी-गणपतींची आकर्षक सजावट करून स्थापना करण्यात आली. फुलांनी, रंगीबेरंगी कापडांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने विविध वस्तू व खाद्य पदार्थांनी गौरी गणपती पुढे सजावट करण्यात आली होती. सोन्याच्या पावलांनी आलेल्या गौरी-गणपतींनी घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण केल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *