दमन-दीवच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दोन युवा फुटबॉलपटू अरमान रशिद फकीर व तनिश उमेश गायकवाड यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नुकतेच दमन-दीव येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत दोन्ही खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
खालिद सय्यद, राजेंद्र पाटोळे, झेव्हियर स्वामी, प्रदीप जाधव व राजेश अँथनी यांनी वीस मुलांमध्ये अरमान फकीर व तनिश गायकवाड यांची निवड करुन त्यांना महाराष्ट्र संघासाठी मुंबई येथे झालेल्या निवड चाचणीला पाठवले होते. त्यांनी निवड चाचणीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्यांना महाराष्ट्राच्या संघात संधी देण्यात आली आहे.
5 ते 25 जानेवारी दरम्यान दमन-दीव येथे फुटबॉलची राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये दोघेही महाराष्ट्राच्या संघात खेळणार आहे. अरमान फकीर हा फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब तर तनिश गायकवाड हा फ्रेंड्स क्लबचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूंनी फुटबॉलमध्ये शहराचे नाव उंचावले आहे.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालीद सय्यद, रिशपालसिंग परमार, प्रदीपकुमार जाधव, व्हिक्टर जोसेफ, झेव्हियर स्वामी, पल्लवी सैंदाणे आदींसह अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी दोन्हींचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.