• Tue. Oct 14th, 2025

छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाचव्या दिवशीही उपोषण सुरु

ByMirror

Sep 30, 2025

बुधवारपासून पाणी देखील घेणार नसल्याचा इशारा


श्रीरामपूर गॅस स्फोटातील पीडितांना न्याय मिळण्याची मागणी


फायनान्स कंपनीच्या गोरखधंद्यात अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 24 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीच्या गॅस टाकी गळती व स्फोटाच्या भीषण दुर्घटनेला सात वर्षे उलटली, मात्र आजतागायत पीडित कुटुंबांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. उलट, संबंधित गॅस कंपनी व स्थानिक एचपी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. याविरोधात सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग पाचव्या दिवशी उपोषण सुरु असून, बुधवारपासून पाणी देखील घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.


या दुर्घटनेत गौरव बागुल, चंद्रकांत जौंजाळ, सचिन जौंजाळ, प्रमोद जौंजाळ, मधु बागुल या कुटुंबांचे घरगुती साहित्य, मंडप डेकोरेशन साहित्य, डीजे सिस्टीमसह महागडे साहित्य जळून खाक झाले. पोलिस, तहसीलदार व तलाठ्यांनी पंचनामा केला होता. दत्तनगर ग्रामपंचायत व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानेही दाखला दिला होता. मात्र, सात वर्षांनंतरही पीडितांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.


संघटनेने सादर केलेल्या निवेदनात आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार मागासवर्गीय कुटुंबाचे राहते घर खासगी फायनान्स कंपनीने जप्त केले. तत्कालीन अप्पर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी तसेच एमआयडीसी पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर मदत केली. अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 चा चुकीचा वापर करण्यात आला. एनपीए वर्गवारीत जाणीवपूर्वक छेडछाड करून फायनान्स कंपनीला मदत करण्यात आली. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून चुकीची कर्ज वसुली व लुटमार करण्यात आली.


याशिवाय, कर्जदार विजय लोंढे यांना पंतप्रधान आवास योजनेतून 2 लाख 67 हजार मिळतील, असे खोटे आश्‍वासन दिले गेले, पण प्रत्यक्षात ती योजना आधीच बंद झाली होती. परिणामी, लोंढे यांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून ते मानसिकदृष्ट्याही त्रस्त झाले आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या उपोषणात छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, श्रीधर शेलार, मालनताई जाधव, दत्ता वामन, प्रमोद जौंजाळ, कविता जौंजाळ, सचिन जौंजाळ, नंदाबाई शेंडे, सोनल जौंजाळ, विशाल जगताप, सिद्धांत पाटोळे, पोपट दोंदे, विजय लोंढे आदी सहभागी झाले आहेत. प्रशासनाने लक्ष न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


गॅस कंपनी व स्थानिक एचपी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करावा, पीडित कुटुंबांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, बेकायदेशीररीत्या घर जप्ती करणाऱ्या फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करावा, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, जप्ती प्रक्रियेची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *