भक्तिमय वातावरणात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरती
भाविकांना महाप्रसादाचे वाटप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोट उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमासाठी शीख आणि पंजाबी समाजातील भाविक, महिला, तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हर श्री नाथ भजनी मंडळाच्या महिला कलाकारांनी सादर केलेल्या भजन-किर्तनाच्या सुरेल कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय बनले. श्रीकृष्णाच्या भजने आणि पारंपारिक कीर्तनाच्या सुरावटींनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. उपस्थित भाविक या भक्तिरसात मंत्रमुग्ध झाले.
दरवर्षी गोवर्धन पूजेनंतर अन्नकोट महोत्सवाचे आयोजन मंदिरात केले जाते. या परंपरेनुसार यंदाही राधा-कृष्ण मंदिरात भक्तांनी विविध प्रकारचे मिठाई, फराळ, व पारंपरिक खाद्यपदार्थ आणले होते. सर्व अन्नपदार्थांची आकर्षक पद्धतीने सजावट करून छप्पन भोग म्हणून भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखविण्यात आला.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, विश्वस्त मंडळ, तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद (लंगर) व प्रसादाचे वाटप करण्यात आले. या अन्नकोट महोत्सवात सर्व समाजघटकातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा संगम झालेल्या या सोहळ्याने सर्जेपुरा परिसर आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाने प्रफुल्लित झाले होते.
