अहमदनगर महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात इंडक्शन सोहळा; करिअर, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन
नवागत विद्यार्थ्यांना देण्यात आली विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जीवनात यश संपादन करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे, स्वतःचे ध्येय निश्चित करणे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रामाणिक परिश्रम घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशाचा भक्कम पाया असतो. त्यामुळे या कालावधीत शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्याचे आवाहन भा. पा. हिवाळे शिक्षण संस्थेचे सचिव विशाल बार्नबस यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इंडक्शन (स्वागत) समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. भा. पा. हिवाळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजनीश बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव विशाल बार्नबस, प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. विलास नाबदे, अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रतुल कसोटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने नवागत विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ख्रिस्तवासी रेव्ह. डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक पारंपरिक नृत्याने उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या सांस्कृतिक सादरीकरणामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रास्ताविक करताना कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रतुल कसोटे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी संस्थेचे संस्थापक डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे आणि त्यांच्या पत्नी रूथबाई हिवाळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत महाविद्यालयाची समृद्ध शैक्षणिक परंपरा, उत्कृष्ट निकालांची परंपरा, शिस्तप्रिय वातावरण, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, विविध अभ्यासक्रम तसेच एका शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उपलब्ध प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती देत भविष्यातील करिअरच्या असंख्य संधींबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात स्पर्धा वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
यानंतर विविध शाखांतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आपल्या-आपल्या विभागाची सविस्तर ओळख करून दिली. कला विभागाचे प्रा. केतन औटी, वाणिज्य विभागाचे प्रा. संकेत तुपे आणि विज्ञान विभागाचे प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी शाखांचे स्वरूप, अभ्यासक्रम, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, संशोधनाच्या संधी, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास आणि महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून सहकार्य करावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पटेकर आणि प्रा. रिबेका थॉमस यांनी केले. तर प्रा. मारिया बार्नबस यांनी आभार मानले. या स्वागत समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मार्शनील स्वामी, मनोज पंडित, प्रशांत पानसंबळ, सेरेना मिसाळ, चेल्सी कुटीनो आणि किरण मोरे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

