• Tue. Jul 1st, 2025

सायकल वारीचे हुंडेकरी परिवाराच्या वतीने शहरात स्वागत

ByMirror

Jun 23, 2025

मुस्लिम समाजातील उद्योजक मागील 13 वर्षापासून करतात सेवा


जिवंत माणसात पांडुरंग पाहून, त्यांची सेवा घडवावी -सोमनाथ घार्गे (जिल्हा पोलीस अधीक्षक)

नगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने मागील तेरा वर्षापासून सायकल वारीचे आयोजन केले जात असून, दरवर्षी करिमशेठ हुंडेकरी या सायकल वारीचे स्वागत करुन हुंडेकरी लॉनमध्ये त्यांच्या जेवणाची, राहण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करत असतात. यामध्ये तीनशे ते चारशे सायकलिस्टचा सहभाग आहे.


मुस्लिम समाजातील हाजी करीमशेठ हुंडेकरी यांनी नाशिकहून पंढरपूरला सायकलवर जाणाऱ्या वारकरींचे मनोभावे स्वागत करुन, दरवर्षी वारकरी माझ्या दारात येतो, मी नशीबवान आहे. 13 वर्षापूर्वी सुरु झालेल्या या उपक्रमाचे अनुभव सांगून, या सेवेत मोठे पुण्य असून, जाती-धर्मात भेद करण्यापेक्षा माणुसकी धर्म जपण्याचा संदेश त्यांनी दिला.


या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेशष शाखेचे दिनेश आहेर, सायकलिस्ट दिंडीचे अध्यक्ष श्री काळे, पोलीस अधिकारी संजय बारकुंड आदी उपस्थित होते. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने हुंडेकरी यांचा सत्कार करण्यात आला.


पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, स्वत: टेनिस खेळाडू असल्याने आरोग्याप्रती जागरुक राहून सायकलिंग व रनिंग करत असतो. या सायकल वारीत देखील काही वेळ सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागल्याने वारकरी तहान, भूक, कुटुंब विसरून पायी वारीत सहभागी होत असतो. पांडुरंगाची ओढ त्याला खेचत असते. आरोग्याचा संदेश देऊन दरवर्षी निघत असलेली या सायकल वारीचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट करुन, जिवंत माणसात पांडुरंग पाहून, त्यांची सेवा घडवावी! हा संदेश त्यांनी दिला.


50 सायकलपटूंच्या उपस्थितीमध्ये सुरु झालेल्या या दिंडीत तीनशे ते चारशे महिला-पुरुष सायकलपटू दरवर्षी सहभागी होत आहे. पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा जागर करीत निघालेल्या या सायकल दिंडीचा पहिला मुक्काम हुंडेकरी लॉनमध्ये असतो. दरवर्षी हुंडेकरी लॉन त्यांच्या स्वागतासाठी खुले ठेवले जाते. या सोहळ्यासाठी लग्नाची तारीख देखील घेतली जात नाही, तर तो दिवस फक्त या वारकरींसाठी राखीव ठेवला जातो. यामध्ये सर्व सायकलपटू वारकरींच्या राहण्यापासून ते नाष्टा व जेवणाची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *