• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाई सथ्था नाईट हायस्कूलने डॉजबॉलमध्ये पटकाविले विजेतेपद

ByMirror

Jan 24, 2025
विविध प्रकारच्या थेरपी व उपचार केल्या जाणार अल्पदरात

शहरात रंगला आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सव

विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीला जीवनाची शिदोरी बनवावी -डॉ. पारस कोठारी

नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने शहरात झालेल्या आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सवात डॉजबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. तर शालेय खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मासूम संस्थेच्या वतीने नुकतेच क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रात्रशाळेतील प्रवेशित विद्यार्थीनी वयाने मोठ्या असल्याने शालेय स्पर्धेत त्यांना सहभागी होता येत नाही. या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता यावा व त्यांच्यातील साघिक भावना वाढीच्या दृष्टीने मासूम संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रीडा मेळाव्यात सांघिक मुलींसाठी डॉजबॉल व वैयक्तिकमध्ये मुला-मुलींसाठी 100 मीटर, 50 मीटर धावणे या स्पर्धेचा समावेश करण्यात होता. 100 मीटर धावणे स्पर्धेत भाई सथ्था नाईट हायस्कूलचा खेळाडू अक्षय कोतकर याने प्रथम व भावेश भिंगारदिवे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थिनींमध्ये 50 मीटर धावणे स्पर्धेत इशिता भोर हिने प्रथम क्रमांक मिळविला.


या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मार्च 2024 परीक्षेत मासूम संस्थेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थिनी रूपाली बिल्ला, शारदा मंगलपेल्ली, वैष्णवी जोशी, एसएससी विभाग प्रमुख गुरुप्रसाद पाटील, एनएसटीपी विभागाचे सिनिअर प्रोग्राम हेड संदीप शेलार, प्रोग्राम हेड निलेश ठोंबरे, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य व मासूम संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य सुनील सुसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा शिक्षक बाळू गोरडे, कैलास करांडे आदी उपस्थित होते.


डॉजबॉल स्पर्धेत अटीतटीचे सामने रंगले होते. भाई सथ्था नाईट हायस्कूलचा अंतिम सामना सरस्वती नाईट हायस्कूल रात्रप्रशालेबरोबर झाला. यामध्ये काही गुणांनी सरस्वती नाईट हायस्कूलला पराभवाचा सामना करुन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या डॉजबॉल संघात इशिता भोर (कर्णधार), माही शेटीया (उपकर्णधार), प्रियंका शिंदे, दीक्षा गवळी, वर्षा साठे, श्‍वेता सदाफळे, साक्षी निमसे, सीमा काळे, रंजना कांबळे, अश्‍विनी दिंडे, ऋतुजा पवार या विद्यार्थिनी खेळाडूंचा सहभाग होता. पंच म्हणून गणेश वाळूंजकर व अक्षय कर्डिले यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन मंगेश भुते यांनी केले.


स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी स्पर्धेसाठी आलेल्या नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन स्वागत केले. डॉ. कोठारी म्हणाले की, जीवनात प्रत्येक टप्प्यांवर स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरुन खेळाडूवृत्ती अंगीकारली पाहिजे. खेळाडूवृत्तीला जीवनाची शिदोरी बनवून यश प्राप्त करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अकरावीसाठी भाई सथ्था नाईट हायस्कूल तर्फे स्वागत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.


नाईट हायस्कूलच्या संघाने विजेते पद मिळविल्याबद्दल सहभागी विद्यार्थी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजितशेठ बोरा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रात्र शाळेच्या विद्यार्थिनींना खेळाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी क्रीडा मेळावा आयोजित केल्याबद्दल मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, कमलाकर माने, युवराज बोराडे व मासूम संस्थेची सर्व टीमचे सुनील सुसरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली सातळकर यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *