प्रजासत्ताक दिनाचा विधाते विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम
शिक्षणाने सक्षम भारताचे स्वप्न साकारले जाणार -विशाल लाहोटी
नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैश्यातून जमा केलेल्या रकमेतून विद्यालयास कपाट भेट दिले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ट्रेक कॅम्प संस्थेचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब विधाते, सरचिटणीस शिवाजीराव विधाते, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सूसे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल लाहोटी म्हणाले की, भारत देशाने 26 जानेवारीला राज्यघटनेचा स्विकार करुन प्रगतीपथाकडे वाटचाल केली आहे. शिक्षण हा अधिकार देखील मुलांना मिळाला असून, शिक्षणाने सक्षम भारताचे स्वप्न साकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजीराव विधाते यांनी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल लाहोटी यांनी देखील विद्यालयास एक कपाट भेट दिले. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर भाषणे सादर केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बर्डे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय लता म्हस्के यांनी करुन दिला. आभार सारिका गायकवाड यांनी मानले.