• Thu. Mar 13th, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूलचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले

ByMirror

Feb 10, 2025

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन; मोबाईलचे धोके दर्शविणाऱ्या मुक नाटीकेने वेधले लक्ष

नगर (प्रतिनिधी)- दिवसभर विविध कामे करुन रात्रशाळेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले. अर्धवट शिक्षणानंतर पुन्हा रात्रशाळेत प्रवेशित झालेले अनेक ज्येष्ठ विद्यार्थी आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी जाग्या केल्या.


सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, पेमराज सारडा महाविद्यालयाचे उपप्राचार्य गिरीश पाखरे, सीनियर कॉलेजच्या प्राचार्या माहेश्‍वरी गावित, सीए अशोक गुर्जर, हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन पारस कोठारी, सिताराम सारडा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगला भोसले, नाईट स्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब गोरडे, शिक्षकेतर प्रतिनिधी अविनाश गवळी आदींसह नाईट स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी राज्यातील सर्वात मोठी नाईट स्कूल म्हणून भाई सथ्था नाईट स्कूल पुढे आली आहे. अद्यावत शिक्षण प्रणाली व तळमळीने शिकवणारे शिक्षकांच्या माध्यमातून नाईट स्कूलचे विद्यार्थी आपले भवितव्य घडवित आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मुंबई येथील मासुम संस्थेचे सहकार्य लाभत असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करा व स्पर्धेत उतरण्याचा संदेश दिला.


प्राचार्य गिरीश पाखरे म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व पटलेले विद्यार्थी रात्रशाळेत येतात. कष्ट करुन शिक्षण घेणाऱ्यांचे कौतुक वाटते. कष्ट, अनुभव याची सांगड घालून यश प्राप्त होते. फक्त कष्ट करून पुढे जाता येणार नाही, कष्टाला शिक्षणाची जोड द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे त्यांनी कौतुक केले.


प्राचार्या माहेश्‍वरी गावित यांनी नाईट शाळेत विद्यार्थी कष्ट करुन शिक्षण घेऊन भवितव्य घडवत आहे. कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर सारडा महाविद्यालयाचे दार खुले असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.
सीए अशोक गुर्जर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी सीए करण्यासाठी पुढे यावे. सीए करण्यासाठी इंग्रजी व गणित या विषयाचे ज्ञान आवश्‍यक असून, सीएचे काम करण्यासाठी कुठलेही भांडवल लागत नाही. ज्या विद्यार्थ्यांना सीए होण्याची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गीतांवर नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मोबाईलचे धोके दर्शविणाऱ्या मुक नाटीकेने सर्वांचे लक्ष वेधले. मुला-मुलींनी वैयक्तिक नृत्य सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शरद पवार, प्राध्यापक मंगेश भुते, प्राध्यापक कैलास करांडे व प्रशांत शिंदे यांनी नाटक स्वरुपात करुन शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी रात्रशाळेचे महत्त्व विशद केले.


वैशाली दुराफे, उज्वला साठे, वृषाली साताळकर, स्वाती होले, अनुराधा गायके विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, अनिरुद्ध देशमुख ,अमोल कदम, शिवा शिंदे, संदेश पिपाडा, अशोक शिंदे, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी,कैलास बाल्टे, मनोज कोंडेजकर, ओंकार कुलांगे, विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा गवळी, माही सेटिया, सारिका गुज्जेटी, ओम काळे, प्रशांत भिसे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *