शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना
नगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.7 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30 वाजता ईदची नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर कुर्बानी करताना इतर धर्मियांना त्रास होणार नाही, यासाठी समाजबांधवांना विशेष सूचना करण्यात आल्या.
पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानसह शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
बकरी ईद निमित्त तीन दिवस म्हणजे शनिवार पासून सोमवार पर्यंत घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे. सोशल मीडियावर देखील बकरी ईदच्या शुभेच्छांचा पाऊस पडला होता.