• Sat. Jul 19th, 2025

आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेत थाळी नाद

ByMirror

Jan 29, 2024

तीन महिन्यांचे थकीत पेमेंट मिळण्याची व वाढीव मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी

जोरदार निदर्शने व कानठळ्या बसविणाऱ्या थाळीनादाने जिल्हा परिषद दणाणले

अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांचे थकीत पेमेंट तीन दिवसात करावे व जाहीर करण्यात आलेल्या वाढीव मानधनाचा शासन निर्णय ताबडतोब निर्गमित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सोमवारी (दि.29 जानेवारी) थाळी नाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलक महिलांनी थाळ्या वाजवून प्रशासनाच्या कानठळ्या बसविल्या.


या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष सुवर्णा थोरात, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, आयटकचे राज्य उपाध्यक्ष सुधीर टोकेकर, वर्षा चव्हाण, उषा अडांगळे, जयश्री गुरव, सविता गिरे, अंबिका भालेराव, सुषमा कपाटे, सविता धापटकर, अनिता साळुंके, संगीता त्रिभुवन, शैला एखंडे, स्मिता ठोंबरे, कोमल कासार, विद्या मुंढेकर, सुप्रिया जाधव आदींसह आशा व गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


बुरुडगाव येथील भाकपच्या पक्ष कार्यालयातून मोर्चाला प्रारंभ झाले. घोषणाबाजी करत आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. या आंदोलनात दीड हजार आशा वर्कर व शंभर गट प्रवर्तक सहभागी झाले होते. या आंदोलनास अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. सतीश पवार, सुभाष शिंदे, अंगणवाडी सेविका सुमन सप्रे, स्मिता औटी यांनी पाठिंबा दिला. गेल्या ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या तीन महिन्याचे मानधन अजूनही आशा व गटप्रवर्तकांना देण्यात आलेले नाही. सदर मानधन रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. परंतु आशांच्या खात्यावर यायला अजून विलंब होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शासनाने मुंबई येथील बैठकीत व आझाद मैदान आणि नागपूर येथील मोर्चात आशा वर्कर यांना 7 हजार रुपये व गटप्रवर्तक यांना 10 हजार रुपये वाढ जाहीर केलेली आहे. त्या वाढीचा शासन निर्णय अद्यापि निघालेला नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


तीन महिन्याचे थकीत मानधन ताबडतोब तीन दिवसात मिळावे व वाढीव पगाराचा शासन निर्णय त्वरीत निर्गमित करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा सह आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिंदे यांना देण्यात आले. येत्या दोन दिवसात मागील तीन महिन्याचे थकीत पेमेंट आशांच्या खात्यावर वर्ग करण्याचे तर शासन निर्णयाची मागणी वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे आश्‍वासन डॉ. शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *