कव्वाली आणि देशभक्तीवरील गीतांनी जिंकली मने
विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरावे -रेहान काझी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्यूनिअर कॉलेज आणि ऐम इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. नृत्याविष्कार व नाटिकेतून कलागुणांचे सादरीकरण करुन विविध सामाजिक संदेश दिला. विविध गाण्यांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता.
माऊली संकूल सभागृहात झालेल्या स्नेहसंमेलनाची सुरुवात कुरआन पठनाने झाली. हज कमेटीचे अध्यक्ष सलीम बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश मोरे, संस्थेचे सचिव रेहान काझी, इनाम खान, वाजिद खान, इफ्तेखार अहमद, रुमाना खान, नाजनीन शेख आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुनव्वर हुसैन यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्काराची जोड देऊन त्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला.
रेहान काझी म्हणाले की, शालेय जीवनात पास-नापास व कमी गुण महत्त्वाचे नसून, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेने स्वत:ला सिध्द करावे. कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरल्यास भविष्यातील वाट सापडणार आहे. विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करुन वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
विविध गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण व सामाजिक संदेश देणाऱ्या नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कव्वाली आणि देशभक्तीवरील गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतीफ राजे, फिरदौस खान, आयेशा शेख व सबा परवीन खान यांनी केले. शाहनवाज पटेल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.