युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फुटबॉल खेळाच्या वाढीसाठी मान्यताप्राप्त पंचाची भूमिका महत्त्वाची -नरेंद्र फिरोदिया
नगर (प्रतिनिधी)- फुटबॉल खेळाडूंसह उत्तम प्रशिक्षक घडविण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय फुटबॉल पंच (रेफ्री) प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाले आहे. या शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे, फिजिकल डायरेक्टर डॉ. सॅवियो वेगास, जिल्हा फुटबॉल संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, सचिव रौनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण सुरु असून, युवकांमध्ये फुटबॉलची आवड वाढवण्यासह, प्रशिक्षित आणि पात्र रेफ्री तयार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकून या शिबिराजे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेले हे दुसरे प्रशिक्षण शिबिर आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातून 25 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, त्यांना फुटबॉल नियमांचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये थियरी बरोबरच प्रत्यक्ष मैदानावर प्रात्यक्षिके, निर्णय क्षमतेचा विकास तसेच रेफ्रीच्या भूमिकेतील जबाबदाऱ्या यांचे प्रशिक्षण समाविष्ट आहे.
प्रशिक्षण वर्गाला अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) मान्यताप्राप्त प्रशिक्षक रमेश सुब्रमण्यम आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे रेफ्री प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य धनराज मोरे (मुंबई) हे मार्गदर्शन करत आहेत.
प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागी उमेदवारांची लेखी, प्रात्यक्षिक आणि शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त रेफ्री लायसन्स दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, फुटबॉल खेळाच्या वाढीसाठी खेळाडूंच्या विकासासोबतच सक्षम, निष्पक्ष आणि मान्यताप्राप्त पंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा उपक्रमांमुळे खेळाडूंसह पंचांची संख्या वाढते आणि त्यामुळे जिल्ह्यातील फुटबॉलचा दर्जाही उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत अहमदनगर महाविद्यालयाकडून मिळालेल्या सहकार्य व उत्कृष्ट सुविधा आणि नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजनीश बार्नबस आणि सचिव विशाल बार्नबस यांचे विशेष आभार मानण्यात आले.